Monday, June 1, 2026
HomeAdministrationअप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

कोल्हापूर, प्रतिनिधी : जिल्हा प्रशासनात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय सेवा बजावून जनतेशी सुसंवाद राखत प्रशासनाला सक्षम दिशा देणारे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अपर चिटणीस तथा तहसीलदार संजीवन मुंडे आणि जिल्हा निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार पी. जी. पाटील हे नियत वयोमानानुसार ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवार (दि. २९ मे) रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील महाराणी ताराराणी हॉलमध्ये हा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक महसूल अधिकारी अंकुश रानमाळे यांनी केले. त्यांनी निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेत त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पन्हाळा तालुक्याच्या मंडळ अधिकारी नलिनी मोहिते यांनी प्रभावीपणे केले.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत निवृत्त अधिकाऱ्यांच्या कार्यशैली, नेतृत्वगुण आणि सहकाऱ्यांशी जपलेल्या सलोख्याच्या नात्यांचा गौरव केला. शाहीर विशारद आजाद नायकवडी, विनायक लुगडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघन, राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख तसेच निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना अपर चिटणीस संजीवन मुंडे व अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी महसूल विभागातील आपल्या प्रदीर्घ सेवेत आलेले अनुभव, आव्हाने आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी तिन्ही अधिकाऱ्यांनी प्रशासनात दिलेल्या भरीव योगदानाचा गौरव केला. “महसूल प्रशासनासारख्या अत्यंत गतिमान विभागात या अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता, प्रामाणिकता आणि लोकाभिमुख कार्यपद्धती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच निवृत्तीनंतरच्या त्यांच्या निरोगी, सुखमय आणि शांततापूर्ण आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या समारंभास जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्त अधिकाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular