Tuesday, June 2, 2026
HomePoliticalउपनगराध्यक्ष भोसले यांच्या शब्दाला मान राखत प्रमोद उदाळे यांनी आत्मदहनाला दिली तात्पुरती...

उपनगराध्यक्ष भोसले यांच्या शब्दाला मान राखत प्रमोद उदाळे यांनी आत्मदहनाला दिली तात्पुरती स्थगिती

पन्हाळा प्रतिनिधी / शहानवाज मुजावर

पन्हाळगड येथील नगरपरिषदेच्या पाणी योजनेवरील आर्थिक ताण कमी व्हावा आणि नागरिकांचे पाणी बिलही कमी व्हावे, या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी सोलर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पासाठी संबंधित ठेकेदाराने सुमारे ४० लाख रुपयांची रक्कम उचल केल्याचा आरोप असून, प्रत्यक्षात जागेवर अपेक्षित काम झाले नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रमोद उदाळे यांनी केली आहे.

या प्रश्नाला वाचा फोडत प्रमोद उदाळे यांनी १ मे रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. नगराध्यक्ष आणि काही सदस्यांच्या विनंतीनंतर तसेच उपनगराध्यक्ष सतीश भोसले यांच्या मध्यस्थीमुळे त्यांनी ते उपोषण मागे घेतले होते. मात्र, सोलर प्रकल्पाच्या कामाबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याने उदाळे यांनी आपला लढा कायम ठेवत २ जून रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता.

प्रशासनाकडून सोलर प्रकल्पाबाबत वारंवार खोटी आश्वासने दिली जात असल्याचा आरोप करत, ३० जूनपर्यंत काम पूर्ण न झाल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता मुख्याधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रमोद उदाळे, सुनीता उदाळे आणि पृथ्वीराज नाईकवाडी यांनी दिला आहे.

दरम्यान, आज सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पन्हाळा पोलिसांनी प्रमोद उदाळे यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेत आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्तात सकाळी ११ वाजता आणले. त्याआधीच गडावरील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येत आंदोलनासाठी सज्ज झाले होते.

आंदोलनादरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, एमएसईबीकडून जुन्या पद्धतीचे सोलर पॅनल बसवायचे की नव्या तंत्रज्ञानाचे, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आवश्यक परवानग्या प्रलंबित असल्यामुळे काम थांबले असून, एमएसईबीचा निर्णय मिळताच ३० जूनपूर्वी सोलर प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संतप्त जमावामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष सतीश भोसले यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहत नागरिकांसमोर प्रशासनाला ३० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचा सज्जड इशारा दिला. मुदतीत काम पूर्ण न झाल्यास नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी उपस्थित नागरिकांनी प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्या काळातील सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी केली. यावर उपनगराध्यक्ष भोसले यांनी प्रशासकीय काळातील सर्व कामांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.

या आंदोलनावेळी संग्रामसिंह भोसले, शिवकुमार सोरटे, श्रीकांत कांबळे (आप्पा), जमीर गारदी, अख्तर मुल्ला, फरीद मुल्ला, मृणाल जगदाळे, फराह झांजी, रसिया आगा, नगरसेवक रामानंद गोसावी, अभिजीत गायकवाड, प्रदीप गवळी, बाळासाहेब काशीद, शकील मुतवल्ली यांच्यासह गावातील अनेक  नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular