बहिरेश्वर प्रतिनिधी
: कसबा बीड (ता . करवीर) हे गाव शिलाहार राज्याची उपराजधानी व लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध आहे.बीड गावात सोन्याचा पाऊस पडतो ही एक अख्यायिका आहे.याचा येथील ग्रामस्थांना नेहमीच प्रत्यय येतो. पुर्वीपासूनच येथे सुवर्ण मुद्रा, सुवर्ण अलंकार,चांदीची नाणी,दगडी विरघळ, प्राचीन मंदिरांचे अवशेष, प्राचीन दगडांच्या पाषाणी मुर्ती वारंवार सापडतात.
सापडऱ्या या सुवर्ण मुद्रांना स्थानिक भाषेत बेडा असे संबोधले जाते.असेच बेडे कसबा बीड येथील बाळासो शंकरराव वरुटे व राजर्षी गजानन मगदूम यांना मृग नक्षत्रात मुहूर्तावर दिनांक-०९ व ११ या दोन दिवशी हे बेडे सापडले आहेत.
बाळासो वरूटे यांना सापडलेला बेडा हा खळे म्हणून ओळखले जाणाऱ्या परिसरातील पानंद रस्त्यावर जनावरे चारत असताना सापडला.याच्यावर फुलाचे अंकण असून सदर बेडयाचा व्यास ७ मिमी तर वजन ०.७८ ग्रॅम इतके आहे. तसेच राजश्री मगदूम यांनाही असाच एक बेडा तुळशी घाट परिसरातील रविंद्र पाटील यांच्या शेतात भांगलन करत असताना सापडला. सदर बेड्यावर त्रिशुळाचे अंकण असून त्याचा व्यास ७ मिमी तर वजन ०.७६ ग्रॅम इतके आहे.
मागील काही वर्षात कसबा बीड गावात सोने सापडण्याचा इतिहास ताजा असतानाच या वर्षातील या दोन घटना घडल्या आहेत.गावात हे सोन्याचे बेडे सापडल्याने परत एकदा सोन्याच्या पावसाची चर्चा गाव व परिसरात सुरू झाली आहे.
आश्चर्य म्हणजे एवढ्या लहानशा तुकड्यावर इतके बारीक अंकण करण्याचे कसब पाहीले असता ही दैवी देणगी आहे असे वाटल्यावाचून राहत नाही.
असे सापडणारे बेडे हे कसबा बीड गावच्या गतवैभवाची जणू साक्ष देत आहेत.आजही या गावात सापडणाऱ्या बेड्यांना दैवी आशिर्वादाच्या स्वरुपात घरातील देवघरात पुजले जातात.कसबा बीड येथील ऐतिहासिक ठेव्याचे जतन, संवर्धन आणि संशोधन करणारी यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी ही संघटना अशा सुवर्णमुद्रांची माहीती संकलित व प्रसारित करत असते.