गडमुडशिंगी (जि. कोल्हापूर): ग्रामपंचायत गडमुडशिंगी येथे ग्रामसेवक नसल्याने गावातील विकास कामे ठप्प झाल्याचा मुद्दा उपस्थित करून काल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन देणाऱ्या सतेज उर्फ बंटी पाटील गटातील प्रशासक (सरपंच) अश्विनी शिरगावे व त्यांच्या समर्थकांनी आज आलेल्या नवीन ग्रामसेवकाला शिवीगाळ करून कामावर हजर न राहण्याची धमकी दिल्याची घटना घडली. ही घटना ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांच्या उपस्थितीत घडली.
काल, दिनांक २९ जून २०२६ रोजी सत्तेज उर्फ बंटी डी. पाटील गटातील प्रशासक (सरपंच) अश्विनी शिरगावे, अरुण शिरगावे, गटनेते संजय पाटील, रावसाहेब पाटील, सुदर्शन पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यात ग्रामसेवक नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणी येत असल्याचे व विकास कामे ठप्प झाल्याचे नमूद केले होते.
या निवेदनाच्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद व पंचायत समितीने श्री. राहुल खोत यांना ग्रामसेवक म्हणून गडमुडशिंगी ग्रामपंचायतीकडे नियमित कामकाज सुरू करण्यासाठी पाठविले. श्री. राहुल खोत जेव्हा ग्रामपंचायत कार्यालयात हजर झाले, तेव्हा प्रशासक अश्विनी शिरगावे, त्यांचे पती अरुण शिरगावे, गटनेते संजय पाटील, सुदर्शन पाटील, उत्तम पाटील यांनी त्यांना शिवीगाळ केली. “तू या ग्रामपंचायतीत काम करायचे नाहीस, इथे हजर राहायचे नाहीस,” अशी धमकीही दिली.
दुहेरी भूमिका?
एक बाजूला ग्रामसेवक नसल्याबद्दल तक्रार करणे आणि दुसऱ्या बाजूला हजर होणाऱ्या ग्रामसेवकाला काम करू न देणे, अशी दुहेरी भूमिका सत्तेज उर्फ बंटी पाटील गटाकडून घेतली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ही घटना ग्रामस्थांच्या समोरच घडल्याने संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकाराचा गावकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून, प्रशासक अश्विनी शिरगावे, अरुण शिरगावे, संजय पाटील, सुदर्शन पाटील यांच्या वर्तणुकीचा जाहीर निषेध केला. ग्रामस्थांनी असेही सांगितले की, राजकीय हेतूने ग्रामपंचायतीचे कामकाज बाधित केले जात आहे, ज्यामुळे गावाचा विकास खुंटला आहे.
या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. सदर घटनेची पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.