Thursday, July 2, 2026
HomePoliticalकोल्हापुरातून 'डिजिटल इम्युनिटी' उपक्रमाचा शुभारंभ; सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृतीवर भर

कोल्हापुरातून ‘डिजिटल इम्युनिटी’ उपक्रमाचा शुभारंभ; सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृतीवर भर

कोल्हापूर, दि. २ जुलै : शालेय विद्यार्थी, महिला आणि शिक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘डिजिटल इम्युनिटी’ या विशेष प्रबोधन व पथदर्शी कार्यक्रमाचा शुभारंभ शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता शाहू स्मारक सभागृह, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे.

वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, या उपक्रमाची सुरुवात कोल्हापुरातून करण्यात येत आहे. त्यानंतर राज्यभर टप्प्याटप्प्याने हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

डिजिटल युगात इंटरनेट, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर वाढत असताना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, ओटीपी फसवणूक, सायबर छळ, सोशल मीडियाचा गैरवापर आणि इतर सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, महिला आणि शिक्षकांना सुरक्षित डिजिटल वापराचे ज्ञान व कौशल्ये देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

कार्यक्रमात सुरक्षित डिजिटल व्यवहार, सोशल मीडियाचा जबाबदार वापर, डिजिटल गोपनीयता, सायबर कायदे, सायबर तक्रार निवारण यंत्रणा, इंटरनेट व्यसनाचे मानसिक परिणाम, सायबर लैंगिक गुन्हे, डिजिटल वेलनेस, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा सुरक्षित वापर आणि ‘डिजिटल रक्षक’ या संकल्पनेवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

या प्रशिक्षणामध्ये सोनाली पाटणकर या ऑनलाइन सुरक्षा, सायबर गुन्हे, इंटरनेट व्यसन आणि सायबर लैंगिक गुन्हे या विषयांवर मार्गदर्शन करतील. गुगलतर्फे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी समीर जाधव हे Google Kids Trust & Safety या विषयावर विशेष सत्र घेणार आहेत. उन्मेष जोशी हे सायबर कायदे व ‘डिजिटल रक्षक’ या विषयावर मार्गदर्शन करतील, तर प्रेसन वर्गीस हे World of Games आणि सायबर तक्रार निवारण यंत्रणा याबाबत माहिती देणार आहेत.

प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून सायबर सुरक्षिततेचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा महिला आयोगाचा प्रयत्न असून, सुरक्षित, जबाबदार आणि सशक्त डिजिटल समाज घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या प्रशिक्षणाचा लाभ विद्यार्थी, महिला आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular