Sunday, July 12, 2026
HomePolitical‘गोकुळ’चा खरा बाप कष्टकरी शेतकरीच; आमदार सतेज पाटलांचा अरुण डोंगळेंना टोला ...

‘गोकुळ’चा खरा बाप कष्टकरी शेतकरीच; आमदार सतेज पाटलांचा अरुण डोंगळेंना टोला ‘गोकुळ’ निवडणूक : ‘शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ला विजयी करण्याचे सतेज पाटलांचे आवाहन

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी मोहन कांबळे):
कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणूक रणधुमाळीत सध्या ‘गोकुळचा बाप कोण?’ या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केलेल्या एका वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी डोंगळेंवर जोरदार पलटवार केला आहे. “पहाटेपासून गोठ्यात शेणा-मुतात काम करून घाम गाळणारा कष्टकरी दूध उत्पादक शेतकरी हाच या संस्थेचा खरा मालक आणि बाप आहे,” अशा शब्दांत सतेज पाटील यांनी अरुण डोंगळेंना चोख प्रत्युत्तर दिले.
काही दिवसांपूर्वी अरुण डोंगळे यांनी ‘विश्वास पाटील हेच गोकुळचे बाप आहेत’ असे विधान केले होते, ज्यावर जिल्ह्यात जोरदार टीका झाली होती. या वादात आता थेट उडी घेत आमदार सतेज पाटील यांनी सोशल मीडिया आणि पत्रकाद्वारे आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी माता-भगिनींच्या कष्टामुळेच गोकुळ आज या शिखरावर पोहोचला असून, तेच खऱ्या अर्थाने या संस्थेचे शिल्पकार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
चुयेकरांच्या दूरदृष्टीचा गौरव, १० दिवसांत ८० कोटींचे वाटप
संस्थेच्या यशाचे श्रेय देताना आमदार पाटील यांनी दिवंगत आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच संस्था प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकऱ्यांना दर दहा दिवसाला ८० कोटी रुपयांचे वाटप केले जाते, ज्यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक क्रांती घडल्याचे त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले.
दिलेला शब्द पाळला; म्हशीच्या दुधाला १४, तर गाईच्या दुधाला १० रुपयांची दरवाढ
मागील निवडणुकीत दुधाला दोन रुपये अतिरिक्त दर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षांत आम्ही म्हशीच्या दुधाला प्रति लिटर तब्बल १४ रुपये आणि गाईच्या दुधाला १० रुपये दरवाढ देऊन शेतकऱ्यांचे हित जपले, असा दावा सतेज पाटील यांनी केला. यापुढेही शेतकऱ्यांचा सन्मान राखणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘समविचारी आघाडी’ला साथ देण्याचे आवाहन
येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सर्व मतदारांनी गट-तट आणि राजकीय पक्ष बाजूला ठेवून ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ला साथ द्यावी, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले आहे. आघाडीचे सर्व उमेदवार संस्थेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी समर्थपणे पेलतील, अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular