कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हातील करवीर तालुक्यातील नंदवाळ हे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून, आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी व भाविक श्री विठ्ठल-पांडुरंगाच्या दर्शनासाठी येथे दाखल होतात. या पार्श्वभूमीवर भाविकांना सर्व नागरी सुविधा सुरळीत व सुरक्षितपणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आढावा बैठक पार पडली. या बैठकीत करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी यात्रेच्या नियोजनाबाबत विविध विभागांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या.
बैठकीत वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य व वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिकांचे नियोजन, वैद्यकीय पथके, औषधसाठा, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठीची तयारी, स्वच्छता, स्वच्छतागृहांची व्यवस्था, सुरक्षित अन्नपुरवठा, अन्न व औषध प्रशासनाची तपासणी, अखंड वीजपुरवठा तसेच इतर आवश्यक मूलभूत सुविधांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देताना सांगितले की, आषाढी एकादशीसाठी नंदवाळमध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकरी व भाविकाला सुरक्षित, स्वच्छ आणि सुकर दर्शनाचा अनुभव मिळणे ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. पायी दिंडी मार्गावरील सुविधा, वाहतूक नियोजन, वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिकांची उपलब्धता, औषधसाठा, स्वच्छता आणि वीजपुरवठा यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, प्रांत अधिकारी मोसमी चौगुले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी, प्रतिनिधी पोलीस अधीक्षक किरण कागलकर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर, करवीर तहसीलदार स्वप्निल पवार, उपकार्यकारी अभियंता (महावितरण) अजित अस्वले, सहाय्यक गटविकास अधिकारी (जिल्हा परिषद) अविनाश मेश्राम, कोल्हापूर महानगरपालिका मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, ए. बी. सानप, पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित पाटील, नंदवाळ ग्रामपंचायत अधिकारी प्रियंका पाटील, सरपंच अमर कुंभार, मा.उपसरपंच तानाजी कांबळे, नंदवाळ विठ्ठल मंदिर व्यवस्थापक भीमराव पाटील, बबन पाटील, संदीप उरमाले, नंदवाळ विठ्ठल मंदिर व्यवसाय समितीचे सदस्य तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.