जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या राजकीय भवितव्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. “सात टर्म झाल्या… आता फार फार तर एखादी टर्म. कुठेतरी आपणही थांबलं पाहिजे,” असे वक्तव्य करत त्यांनी भविष्यात सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचे संकेत दिले. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.
चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकारातून आयोजित विविध शासकीय कार्यालयांच्या उद्घाटन व विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना महाजन यांनी जळगाव भाजपच्या भविष्यातील नेतृत्वाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. “आम्ही आता किती दिवस काम करणार? पक्षाची धुरा सक्षम हातात द्यावी लागेल आणि मंगेश चव्हाण हेच जिल्ह्याचे भावी नेतृत्व करू शकतात,” असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.
मंगेश चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक करताना महाजन म्हणाले की, पहिल्यांदा उमेदवारी मिळाली तेव्हा त्यांची फारशी ओळख नव्हती. मात्र, आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावत प्रभावी कामगिरी केली असून त्यांच्या कामाचा अभिमान वाटतो.
यावेळी महाजन यांनी नाव न घेता आपल्या राजकीय विरोधकांवरही अप्रत्यक्ष टीका केली. “कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे. नाहीतर काही जण प्रत्येक ठिकाणी ‘मीच मीच’ करत राहतात,” असा टोला लगावत त्यांनी दीर्घकाळ सत्तेभोवती फिरणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला.
जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या राजकारणात गिरीश महाजन यांचे वर्चस्व निर्विवाद मानले जाते. त्यामुळे त्यांच्या तोंडूनच मंगेश चव्हाण यांचे नाव भावी नेतृत्वासाठी पुढे आल्याने जिल्ह्यात नेतृत्वबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाजन यांच्या या वक्तव्याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

