Sunday, August 2, 2026
HomeCrimeव्हॉट्सॲप ग्रुपद्वारे हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय चालविणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; करवीर पोलिसांची...

व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय चालविणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; करवीर पोलिसांची मोठी कारवाई

कोल्हापूर, दि. २ ऑगस्ट : व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्याद्वारे हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील याला करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.

करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३(२) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४, ५ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी करवीर पोलिसांनी वाशी (ता. करवीर) येथील सनराईज लॉजवर छापा टाकून कारवाई केली होती. तपासात आरोपीने व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करून त्यामध्ये वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या पीडित महिलांचे फोटो पाठवत ग्राहकांना आकर्षित केल्याचे समोर आले होते.

पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी जीवबा नाना जाधव पार्क परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने “सागर पाटील फ्रेंड सर्कल” या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून सदस्यांशी संपर्क साधत असल्याची कबुली दिली. तसेच सुहास निचीते आणि विक्रम दिनकर कांबळे यांच्या मदतीने ग्राहकांना सनराईज लॉजमध्ये बोलावून रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने पैसे स्वीकारून हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय चालवित असल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार, तसेच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

पोलिसांनी आरोपीला ३ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असून, या रॅकेटशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular