कोल्हापूर:
जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाईचे माजी उपप्राचार्य व माजी रसायनशास्त्र विभागप्रमुख व सध्याचे संशोधन मार्गदर्शक प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.सौ.दीपाली पाटील व रिसर्च डायरेक्टर डॉ. संदीप वाटेगांवकर यांनी विकसित केलेल्या जिवाणूजन्य, विषाणूजन्य, कर्करोग, क्षय यासारख्या रोगाविरोधी क्रियाशीलता तपासणीच्या नाविन्यपूर्ण व कार्यक्षम उपकरण पद्धतीला भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे.
या संशोधनात श्रीराम शिक्षण संस्था, पाणीव येथील प्रा.सुषेनराव पाटील व साताराच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे संशोधक मार्गदर्शक डॉ. चंद्रशेखर माने यांचाही समावेश असून त्यांचे यासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. झांबरे म्हणाले, ‘जगभर वाढत्या प्रतिजैविक प्रतिकारशक्तीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी हे उपकरण संशोधकांसाठी प्रभावी साधन ठरेल. जैवरोगाविरोधी क्रियाशीलतेचे अचूक व जलद मूल्यमापन करण्यासाठी विकसित केलेली ही उपकरण-पद्धती संशोधन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. या पेटंटमुळे नवीन औषधी संयुगांच्या विकासाला गती मिळून वैद्यकीय व औषधनिर्मिती क्षेत्राला मोठा फायदा होईल.’
प्रा.सौ. पाटील म्हणाल्या, या नाविन्यपूर्ण संशोधनात आम्ही कार्बोहायड्रेट्स बेस्ड हेट्रोकॉन्ज्युगेट्स जे नॅनोपदार्थ बनविले आहेत, त्याची जैविक क्रियाशीलता या उपकरणाच्या साहाय्याने तपासता येते. या संशोधनात मला माझे मार्गदर्शक, महाविद्यालय व संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, ‘नाविन्यपूर्ण संशोधनातून मिळालेले हे पेटंट महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन गुणवत्तेचा गौरव आहे. संशोधन क्षेत्रातील ही उल्लेखनीय कामगिरी इतर संशोधक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी आशा आहे.’
या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.मदनदादा भोसले, उपाध्यक्ष श्री शंकरराव गाढवे, सचिव डॉ.जयवंत चौधरी, खजिनदार श्री नारायणराव चौधरी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा.(डॉ.) विनोद वीर , सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.