Thursday, August 6, 2026
HomeSocialभारत–पोलंड मैत्रीचा ऐतिहासिक अध्याय; ८ ऑगस्टला पोलंडच्या संसदीय शिष्टमंडळाचा कोल्हापूर दौरा

भारत–पोलंड मैत्रीचा ऐतिहासिक अध्याय; ८ ऑगस्टला पोलंडच्या संसदीय शिष्टमंडळाचा कोल्हापूर दौरा

कोल्हापूर, दि. ६ : भारत–पोलंड संबंधांना नवे बळ देणारा ऐतिहासिक क्षण ८ ऑगस्ट रोजी अनुभवायला मिळणार आहे. पोलंडचे उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वळीवडे येथे पोलिश निर्वासितांना दिलेल्या आश्रयाच्या ऐतिहासिक वारशाला अभिवादन करणार आहे. तसेच प्रस्तावित ‘म्युझियम ऑफ ह्युमॅनिटी अँड पीस’ प्रकल्पाची पाहणीही शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी आणि सोव्हिएत युनियनच्या आक्रमणामुळे लाखो पोलिश नागरिकांना आपला देश सोडावा लागला होता. त्यावेळी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने १९४२ ते १९४८ या कालावधीत वळीवडे येथे सुमारे पाच हजार पोलिश निर्वासितांना आश्रय दिला. छत्रपती घराण्याच्या संरक्षणाखाली आणि कोल्हापूरकरांच्या आत्मीय सहकार्यामुळे या निर्वासितांनी वळीवड्यात शाळा, चर्च, सांस्कृतिक केंद्रे, क्रीडांगणे आणि विविध सामाजिक संस्था उभारून सन्मानाने नवजीवन सुरू केले.

युरोपमध्ये परतल्यानंतरही अनेक पोलिश नागरिकांनी कोल्हापूरला आपले दुसरे घर मानले. या ऐतिहासिक मैत्रीच्या स्मरणार्थ १९९८ मध्ये सुवर्णमहोत्सव आणि २०१९ मध्ये ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

२०१९ मध्ये महाराष्ट्र शासन आणि पोलंड सरकारने संयुक्तपणे वळीवडे येथे ‘म्युझियम ऑफ ह्युमॅनिटी अँड पीस’ उभारण्याची घोषणा केली होती. कोविड-१९ महामारी आणि महापुरामुळे या प्रकल्पाला विलंब झाला असला तरी युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे प्रकल्पाला गती मिळाली. संग्रहालयासाठी मूळ बॅरेक्सचा ऐतिहासिक पाया शोधून त्याचे जतन करण्यासाठी युवराज्ञी संयोगिताराजे यांनी विशेष योगदान दिले.

भारताच्या माजी राजदूत नगमा मलिक, विद्यमान राजदूत नीता भूषण, भारतातील पोलंडचे माजी राजदूत अॅडम बुराकोव्स्की, विद्यमान राजदूत पिओत्र अँटोनी श्विताल्स्की, तसेच पोलिश इन्स्टिट्यूटच्या मालगोर्झाता वेजिसिस-गोवेंबियाक आणि मुंबईतील पोलंडचे वाणिज्यदूत टोमाझ व्हिलगोमास यांच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला अधिक बळ मिळाले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंड दौऱ्यात वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाला अभिवादन करून छत्रपती घराणे आणि कोल्हापूरकरांच्या मानवतावादी कार्याचा गौरव केला होता. याच पार्श्वभूमीवर होणारा हा संसदीय दौरा आणि वर्षाअखेरीस अपेक्षित पोलंडच्या पंतप्रधानांचा कोल्हापूर दौरा भारत–पोलंड संबंधांना नवी दिशा देणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

शिष्टमंडळातील प्रमुख मान्यवर

  • किंगा गायेव्स्का – पोलंड संसद (सेजम) सदस्य व पोलंड–भारत संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षा

  • डॉ. अमित लाथ – उपाध्यक्ष, युरोप इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स

  • टोमाझ झ्यावियोनी – अध्यक्ष, रिजनल चेंबर ऑफ कॉमर्स, कॅटोव्हिस

  • क्रिनल शाह सूरी – संचालक, ग्लोबल अफेअर्स अँड बिझनेस

  • अलेक्सांद्रा ऑस्मान्स्का – संसदीय कार्य संचालक

  • कॅरोलिना व्हुईचिका – आंतरराष्ट्रीय वार्ताहर, Dziennik Gazeta Prawna

महाराष्ट्र शासनाने संग्रहालयाच्या इमारतीसाठी सुमारे ₹१.५ कोटी खर्च केला असून, जागतिक दर्जाचे संग्रहालय विकसित करण्यासाठी ₹५.५ कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात या प्रकल्पाला युनेस्कोची मान्यता मिळवून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

आठ दशकांहून अधिक काळ टिकून असलेल्या भारत–पोलंड मैत्रीचा वारसा जपणारा हा दौरा कोल्हापूरला जागतिक स्तरावर मानवता, करुणा आणि आंतरराष्ट्रीय मैत्रीचे प्रतीक म्हणून अधिक प्रतिष्ठा मिळवून देणारा ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular