मुंबई, दि. ६ : मुंबईच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता असल्याची चर्चा सुरू असतानाच भायखळा येथील महापौरांच्या अधिकृत बंगल्याच्या सुशोभीकरणासाठी पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. बंगल्याच्या बाह्य परिसरातील विविध सुविधा उभारण्यासाठी २ कोटी ८९ लाख रुपयांचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले असून, गेल्या सहा महिन्यांत या बंगल्यावर होणारा एकूण खर्च सुमारे ७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार असल्याची चर्चा आहे.
यापूर्वी अवघ्या चार महिन्यांत बंगल्याच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी ४ कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्याआधी नवीन महापौर रितू तावडे यांच्या वास्तव्यापूर्वी प्राथमिक दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर स्थायी समितीने ३ कोटी ४० लाख रुपयांच्या नूतनीकरण प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
नव्या टेंडरनुसार, ई. एस. पाटनवाला रोडलगत वाहतुकीचा आवाज कमी करण्यासाठी नॉइज बॅरिअर, पर्जन्यजल व सांडपाणी वाहिन्यांचे जाळे, इंटरलॉकिंग काँक्रीट पेव्हर्स, तसेच भूमिगत आणि उंचावरील पाण्याच्या टाक्यांची उभारणी केली जाणार आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या विकासकामांसाठी मुदत ठेवी मोडल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांच्या अधिकृत निवासस्थानावर होत असलेल्या कोट्यवधींच्या खर्चावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सुमारे ६ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या बंगल्यावर एवढा मोठा खर्च करण्याची आवश्यकता काय, असा सवाल उपस्थित केला जात असून, या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप-शिवसेना आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.