Thursday, August 6, 2026
HomePoliticalकुणबी प्रमाणपत्रांवरून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; मराठा समाजाचा छळ होत...

कुणबी प्रमाणपत्रांवरून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; मराठा समाजाचा छळ होत असल्याचा आरोप

आंतरवली, दि. ६ : राज्यात रद्द करण्यात येत असलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंतरवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मराठा समाजाला राजकीय हेतूने लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला.

जरांगे पाटील म्हणाले की, कुणबी जात प्रमाणपत्रांच्या विषयावर सरकारकडून जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण केला जात असून, अधिकाऱ्यांवर दबाव टाकून प्रमाणपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. मराठा समाजाचा राजकीय कारणांसाठी छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

यावेळी त्यांनी दावा केला की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असून, संबंधित पत्र अस्तित्वात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले, “एका आडनावाचे हजारो लोक असताना राजकीय द्वेषातून सर्वांवर कारवाई करणे योग्य नाही. अधिकाऱ्यांना फोन करून कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सांगितले जात असल्याचे चित्र आहे. राजकारणासाठी मराठा समाजाला लक्ष्य केले जात आहे.”

बावनकुळे यांचाही उल्लेख करत त्यांनी इशारा दिला की, मराठा समाजाची प्रमाणपत्रे रद्द करण्याचे अधिकार कोणालाही दिल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल. सरकारने मराठा समाजाविरोधात भूमिका घेऊ नये, असे आवाहन करत त्यांनी मराठा युवकांचे नुकसान होईल असे निर्णय टाळण्याची मागणी केली.

सरकारने मराठा समाजाविरोधात कारवाई सुरूच ठेवल्यास त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular