Saturday, August 8, 2026
HomeCrimeबेकायदेशीर गर्भलिंग निदान (PCPNDT) प्रकरणात आणखी एका एजंटला अटक; 12 ऑगस्टपर्यंत पोलीस...

बेकायदेशीर गर्भलिंग निदान (PCPNDT) प्रकरणात आणखी एका एजंटला अटक; 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान (PCPNDT) प्रकरणाच्या तपासात करवीर पोलिसांना आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले असून, या गुन्ह्यातील पाहिजे असलेला एजंट किरण बापुसो चव्हाण (वय 29, रा. आमजाई वरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी डॉ. चंद्रकांत गायकवाड आणि शब्बीर हजारी यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने दोघांनाही 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

यापूर्वी करवीर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी स्वप्निल केरबा पाटील याला त्याचे दोन एजंट संतोष ज्ञानदेव कोळी (रा. मडिलगे, ता. भुदरगड) आणि नंदकुमार भिमराव पाटील (रा. आरवडे, ता. तासगाव, जि. सांगली) यांच्यासह अटक केली होती.

पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, स्वप्निल पाटील हा कागल-मुरगूड मार्गावरील पिंपळगाव खुर्द येथे पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग तपासणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

या कारवाईदरम्यान आरोपींकडून सोनोस्कोप कंपनीचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी आणि मोबाईल फोन असा सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 407/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 91, 319(2), 3(5) तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम 1961, महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम, गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व निदान तंत्र (PCPNDT) कायदा 1994 आणि वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढत असून, बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी करवीर पोलीस सखोल तपास करत आहेत. आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular