Tuesday, August 11, 2026
HomePoliticalगोरगरिबांचे बंद झालेले रेशन तात्काळ सुरू करा; करवीर शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन

गोरगरिबांचे बंद झालेले रेशन तात्काळ सुरू करा; करवीर शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन

करवीर, दि. १० ऑगस्ट : करवीर तालुक्यातील विविध गावांमधील गोरगरीब आणि पात्र रेशनधारकांचे बंद करण्यात आलेले रेशन तात्काळ सुरू करावे, तसेच रेशन बंद करण्यासाठी लावण्यात आलेले चुकीचे निकष रद्द करावेत, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या करवीर तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी ‘बोंब मारो आंदोलन’ करत शासनाच्या धोरणाचा निषेध केला.

करवीर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रेशनधारकांचे धान्य बंद करण्यात आल्याने गोरगरिबांचे घरगुती बजेट कोलमडले आहे. विशेषतः आयकर विवरणपत्र (IT Return) भरत असल्याच्या निकषावर अनेक लाभार्थ्यांचे रेशन बंद करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला.

सामान्य नागरिक घर बांधण्यासाठी, वाहन खरेदीसाठी किंवा अन्य गरजांसाठी बँकेकडून कर्ज घेताना आयकर विवरणपत्र भरत असतो. त्यामुळे केवळ आयकर विवरणपत्र भरतो म्हणून संबंधित व्यक्ती श्रीमंत ठरत नाही, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. टपरीचालक, केळी-भाजी विक्रेते, अल्पभूधारक शेतकरी तसेच विविध छोट्या व्यवसायांवर उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांनाही या निकषाचा फटका बसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

‘जे खरोखरच रेशनसाठी अपात्र आहेत त्यांच्यावर कारवाई करा; मात्र पात्र आणि गरजू लाभार्थ्यांचे रेशन बंद करू नका,’ अशी मागणी यावेळी करण्यात आली. बंद करण्यात आलेल्या सर्व पात्र रेशनधारकांचे धान्य तात्काळ सुरू करावे, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी अधिकाऱ्यांना रेशन बंद करण्याबाबतच्या निकषांवरून जाब विचारत प्रश्नांची सरबत्ती केली. चुकीच्या निकषांमुळे गोरगरिबांचे रेशन का बंद करण्यात आले, अशी विचारणा त्यांनी केली.

आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे तहसीलदार कार्यालयाचा परिसर घोषणांनी दणाणून गेला.

यानंतर रेशन तात्काळ सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार भालचंद्र यादव आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी विलास देसाई यांना देण्यात आले. संबंधित मागणी शासनाकडे पाठवून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.

दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. बंद झालेले रेशन पुन्हा सुरू करून पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष संघर्ष करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या आंदोलनात करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, शहर प्रमुख विशाल देवकुळे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील, राहुल गिरुले, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, वीरेंद्र भोपळे, सचिन नागटिळक, शिवाजी लोहार, दीपक फ्रेमवाला, सुनील पारपाणी, संतोष चौगुले, दत्तात्रय विभुते, कैलास जाधव, वसंत पवार, मनोज कुरळे, दिलीप चव्हाण, अभिजीत गुरव, अजित चव्हाण, आबा जाधव, रामराव पाटील, धनंजय पाटील, बाबुराव पाटील, प्रफुल्ल घोरपडे, अकबर फकीर, कृष्णात तुरुके, अशोक कोळी, साहिल देवळे, मोहन रजपूत यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी आणि रेशनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular