कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला अखेर वेग आला आहे. सहकार विभागाने गोकुळच्या निवडणुकीसाठी सभासद संस्थांच्या ठरावधारकांची अंतिम यादी निश्चित करण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे गोकुळवर वर्चस्व मिळवण्यासाठी राजकीय पातळीवरील हालचालींना आता वेग येण्याची शक्यता आहे.
सहकार विभागाच्या कार्यक्रमानुसार प्राथमिक दूध संस्थांच्या ठरावधारकांची प्राथमिक मतदार यादी १२ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. या यादीवर २१ ऑगस्टपर्यंत हरकती व आक्षेप नोंदविता येणार आहेत. प्राप्त हरकतींवर सुनावणी घेऊन त्याबाबतचा अंतिम निर्णय ३१ ऑगस्ट रोजी करण्यात येणार असून, ४ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
४,४४८ पात्र ठराव; हजारो दुबार ठरावांचा मुद्दा ऐरणीवर
गोकुळच्या निवडणुकीत पात्र ठरावधारकांची संख्या ४,४४८ आहे. मात्र, विविध राजकीय गट आणि नेत्यांकडून तब्बल ७,४०४ पेक्षा अधिक जादा व दुबार ठराव दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मतदार यादीतील पात्रता आणि दुबार ठरावांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
दुबार ठरावांची वैधता, पात्र ठरावधारकांची संख्या आणि कोणत्या संस्थांचे ठराव ग्राह्य धरले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हरकतींच्या सुनावणीदरम्यान यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता असून, निर्णयावर असमाधानी पक्षांकडून न्यायालयीन मार्गाचा अवलंब केला जाणार का, याबाबतही सहकार वर्तुळात चर्चा सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाची धावपळ
गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांच्या कालावधीत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिले होते. मात्र, निवडणूक प्रक्रिया अपेक्षित वेळेत सुरू न झाल्याने याचिकाकर्त्यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.
या आदेशाच्या पार्श्वभूमीवर राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी विभागीय सहनिबंधक, सहकार, पुणे यांना निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत कळविले. त्यानुसार विभागीय उपनिबंधक, दुग्ध, पुणे देविदास मिसाळ यांनी गोकुळ निवडणुकीसाठी मतदार यादी निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
महायुती विरुद्ध विरोधकांची रणनीती काय?
गोकुळ दूध संघ ही कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची आणि आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली संस्था मानली जाते. त्यामुळे या संस्थेवरील वर्चस्वासाठी सत्ताधारी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विरोधक कोणती भूमिका घेतात, कोणते राजकीय गट एकत्र येतात आणि गोकुळच्या सत्तासमीकरणात कोणाची मोट बांधली जाते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आता १२ ऑगस्टला जाहीर होणाऱ्या प्राथमिक मतदार यादीपासून गोकुळच्या निवडणुकीचे खरे राजकीय रणशिंग फुंकले जाणार असून, दुबार ठरावांवरील हरकती आणि अंतिम मतदार यादी हीच पुढील राजकीय समीकरणांची दिशा ठरविणारी ठरण्याची शक्यता आहे.