Thursday, August 13, 2026
HomeEducationजिल्हास्तरीय ‘रेड रिबन’ प्रश्नमंजुषा स्पर्धेत गायत्री पाटील प्रथम

जिल्हास्तरीय ‘रेड रिबन’ प्रश्नमंजुषा स्पर्धेत गायत्री पाटील प्रथम

कोल्हापूर, दि. १२ : आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक आणि रोटरी क्लब ऑफ होरायझन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, कोल्हापूर तसेच समाजकार्य विभाग, सायबर इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने सायबर कॉलेज, कोल्हापूर येथे जिल्हास्तरीय ‘रेड रिबन’ प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एचआयव्ही, क्षयरोग, गुप्तरोग तसेच किशोरवयीन आरोग्य या विषयांवर विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा घेण्यात आली.

महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही आणि एड्सविषयी शास्त्रीय माहिती, आरोग्यविषयक जागरूकता तसेच किशोरवयीन आरोग्याबाबत योग्य समज निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या ज्ञानाचे आणि तयारीचे दर्शन घडविले.

स्पर्धेच्या मुलींच्या गटात शांती गुरुकुल, बाचणी, ता. कागल येथील विद्यार्थिनी गायत्री पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. श्रावणी युवराज दाभोळे हिने द्वितीय, तर अनुष्का विशाल फडतारे हिने तृतीय क्रमांक मिळविला. मुलांच्या गटात देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूलचा राजवर्धन शशिकांत पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला. कैवल्य शिंदे याने द्वितीय, तर मल्हार जाधव याने तृतीय क्रमांक मिळविला.

मुलांच्या गटातील निकाल :
🥇 प्रथम – राजवर्धन शशिकांत पाटील – देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल
🥈 द्वितीय – कैवल्य शिंदे – डी. डी. शिंदे सरकार कॉलेज
🥉 तृतीय – मल्हार जाधव – वि. स. खांडेकर हायस्कूल

मुलींच्या गटातील निकाल :
🥇 प्रथम – गायत्री पाटील – शांती गुरुकुल, बाचणी, ता. कागल
🥈 द्वितीय – श्रावणी युवराज दाभोळे – भोईटे हायस्कूल, क. वाळवे
🥉 तृतीय – अनुष्का विशाल फडतारे – आदर्श गुरुकुल, पेठवडगाव

बक्षीस वितरणप्रसंगी समाजकार्य विभागाचे प्रा. डॉ. दीपक भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोणत्याही स्पर्धेत केवळ बक्षीस मिळविण्याच्या उद्देशाने सहभागी न होता, स्पर्धेची तयारी, विषयाचे ज्ञान आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा प्रत्येक स्पर्धेतील सहभाग हा त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी सायबर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. आर. के. टेलर, समाजकार्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. टी. व्ही. जी. एस. शर्मा, रोटरी क्लब ऑफ होरायझनचे प्रेसिडेंट रो. सागर बकरे, सेक्रेटरी रो. प्रमोद सूर्यवंशी, कम्युनिटी डायरेक्टर रो. ॲड. संदीप पवार तसेच जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरंजन देशपांडे यांनी केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ होरायझनचे प्रेसिडेंट रो. सागर बकरे यांनी मनोगत व्यक्त करत युवकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कपिल मुळे, विनायक देसाई, संदीप पाटील, मकरंद चौधरी, राजेश गोधडे, दीपक सावंत, संजय गायकवाड, क्रांतिसिंह चव्हाण, गीतांजली निंबाळकर, अश्विनी बुबनाळे, प्रिया पवार, सुरेखा जाधव, दीपा कुंभार, इंद्रायणी तारू, सतीश पिसाळ, अभिजित रोटे, सतीश पाटील, चंद्रकांत गायकवाड यांच्यासह रोटरी क्लब ऑफ होरायझनचे पदाधिकारी व सदस्य तसेच विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन प्रा. महेंद्र जनवाडे यांनी केले, तर विनायक देसाई यांनी आभार मानले.

आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्स, क्षयरोग, गुप्तरोग आणि किशोरवयीन आरोग्य याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. ज्ञान, आरोग्यविषयक जागरूकता आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular