कोल्हापूर, दि. १३ : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक समिती सभागृहात आज गुरुवारी जिल्हा परिषद बांधकाम समितीची महत्त्वपूर्ण सभा उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. सारिका यशवंत नांदेकर, सभापती, बांधकाम समिती या होत्या.
सभेच्या प्रारंभी सचिव तथा कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांनी मा. सौ. सारिका यशवंत नांदेकर तसेच बांधकाम समितीच्या सर्व सदस्यांचे स्वागत करून सभेच्या कामकाजास सुरुवात केली. त्यानंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या व प्रस्तावित विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विषयांवर साधक-बाधक चर्चा करून आवश्यक मंजुरी व पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात आले.
सभेत चर्चेत आलेले प्रमुख विषय
-
जिल्हा परिषद स्वनिधीतून तालुकास्तरावरील इमारतींच्या दुरुस्तीबाबत चर्चा करण्यात आली.
-
मुख्य प्रशासकीय इमारतीतील अभिलेख कक्षालगत उपहारगृहाच्या जागी अभिलेख कक्ष विकसित करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
-
जिल्हा परिषद कोल्हापूरच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील विविध लेखाशीर्षांतर्गत कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत चर्चा झाली.
-
रुपये ६० ते ७५ लाखांपर्यंतच्या कामांच्या निविदा मंजुरीसह रुपये ७५ लाखांवरील कामांना मंजुरी देण्याच्या विषयावर विचार करण्यात आला.
-
चंदगड तालुक्यातील ३.५० किलोमीटर लांबीच्या दोन ग्रामीण मार्ग दर्जाच्या रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याबाबत चर्चा झाली.
-
भाऊसिंगजी रोड येथील जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा विकसित करण्यासाठी बीओटी पद्धत किंवा कर्ज उभारणीच्या पर्यायांचा विचार करून शासनास प्रस्ताव सादर करण्यासाठी सल्लागार (कन्सल्टंट) नेमण्याबाबत चर्चा करण्यात आली.
-
विद्युत विभागाकडील विविध कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
-
महसुलात जमा करण्यात आलेल्या सुरक्षा अनामत ठेवीची रक्कम मागणी प्राप्त झाल्यानंतर परत करण्याबाबत स्थायी समितीकडे शिफारस करण्याच्या विषयावर चर्चा झाली.
-
बांधकाम विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूरच्या सन २०२५-२६ च्या वार्षिक प्रशासन अहवालातील प्रकरण २, ३ आणि ६ मधील माहितीचे अवलोकन करून ती जिल्हा परिषदेच्या वार्षिक प्रशासन अहवालात समाविष्ट करण्यास बांधकाम समितीची मान्यता देण्याबाबत चर्चा झाली.
-
पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील अवर्गीकृत पाणंद रस्त्यांचे दर्जोन्नतीकरण करून शासनाच्या रस्ते विकास सूचीमध्ये ग्रामीण मार्ग म्हणून समावेश करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
-
गडहिंग्लज येथील जिल्हा परिषदेच्या गाळ्यांच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली.
-
दि. १५ जुलै २०२६ रोजी झालेल्या मागील सभेचे कार्यवृत्त वाचून कायम करण्यास मान्यता देण्यात आली.

