Sunday, August 16, 2026
HomeEducationकोल्हापूर मनपाच्या 'जरग विद्यामंदिर'च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात गौरव

कोल्हापूर मनपाच्या ‘जरग विद्यामंदिर’च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात गौरव

कोल्हापूर : मोहन कांबळे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करत राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिर (जरगनगर) येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला. राज्याचे पालकमंत्री श्री. प्रकाशजी आबिटकर यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या वर्षीच्या इयत्ता चौथी, पाचवी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जरग विद्यामंदिरच्या तब्बल १३७ विद्यार्थ्यांनी यश मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. यामध्ये ३१ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत, तर १०६ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत बाजी मारली आहे.
शासकीय सोहळ्यात विशेष गौरव झालेले राज्यस्तरीय गुणवंत:
* शिवम बलराम गुरव – इयत्ता चौथी (राज्यात द्वितीय)
* स्वरागिनी विजय केंद्रे – इयत्ता पाचवी (राज्यात द्वितीय)
* मृणाली सचिन जाधव – इयत्ता सातवी (राज्यात द्वितीय)
ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री श्री. प्रकाशजी आबिटकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. जस्मिन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या प्रमुख उपस्थितीत या तिन्ही विद्यार्थ्यांचा टाळ्यांच्या गजरात सत्कार करण्यात आला.
‘The School of Scholars’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जरग विद्यामंदिरने या यशामुळे मनपा प्राथमिक शिक्षण समिती आणि कोल्हापूर शहराचा मान पुन्हा एकदा राज्यस्तरावर उंचावला आहे. मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular