Wednesday, August 19, 2026
HomePoliticalगोकुळ निवडणूक: सतेज पाटील स्वबळावर २५ जागा लढवणार; शेतकरी विरुद्ध श्रीमंत पॅनलची...

गोकुळ निवडणूक: सतेज पाटील स्वबळावर २५ जागा लढवणार; शेतकरी विरुद्ध श्रीमंत पॅनलची लढाई

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया ६० दिवसांच्या आत पूर्ण करण्याची शक्यता निर्माण झाली असून, गोकुळची सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पुणे येथे बुधवारी गोकुळ निवडणुकीबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली.

महायुतीकडून गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत कोणताही प्रस्ताव आपल्यापर्यंत आलेला नसल्याचे सांगत सतेज पाटील म्हणाले की, ही लढाई शेतकऱ्यांना सोबत घेऊन लढणार असून, २५ जागा स्वबळावर लढवणार आहोत. गोकुळमध्ये लोकशाही असावी, ही आपली सुरुवातीपासूनची भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पॅनलसोबत आपण ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोकुळच्या माध्यमातून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार व्हावा, हीच आपली अपेक्षा असल्याचे सांगत पाटील यांनी निवडणुकीचा मुद्दा शेतकऱ्यांच्या हिताशी जोडला. गोकुळमध्ये एकहाती सत्ता असेल, तरच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विकास होऊ शकतो, हे आम्ही यापूर्वी करून दाखवले आहे, असा दावा करत त्यांनी विरोधकांना आव्हान दिले.

दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर होण्याची चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना सतेज पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला. “पैसे महायुतीकडे आहेत. पैशाचा वापर आमच्याकडून होणार नाही,” असे ते म्हणाले.

ही निवडणूक कोणत्या स्वरूपाची असेल, याबाबतही त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “ही लढाई शेतकऱ्यांचं पॅनल विरुद्ध महायुतीच्या श्रीमंत पॅनलची लढाई असेल,” असे पाटील यांनी सांगितले.

आगामी विधानपरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोणताही प्रस्ताव आहे का, असा प्रश्न विचारला असता सतेज पाटील यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले. “२०२८ ची निवडणूक कशी लढायची, हे मला निश्चितपणे माहिती आहे. मात्र माझ्यासाठी साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकरी महत्त्वाचे आहेत,” असे ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची वेळ आली असताना, सतेज पाटील यांच्या या भूमिकेमुळे आगामी निवडणुकीत महायुती आणि शेतकरी पॅनल यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular