कोल्हापूर, दि. २१ ऑगस्ट : कसबा बावडा येथील मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक ११ चा १५५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानास्पद वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि नागरिकांचा प्रतिसाद यामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या वर्धापन दिन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले ते शाळेतील विद्यार्थी प्रणित प्रशांत पाटील याने इयत्ता पाचवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत नववा क्रमांक पटकाविल्याने. त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेच्या तब्बल १४ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी ओपन जीपमधून भव्य रॅली काढण्यात आली. हलगीच्या तालावर निघालेल्या या रॅलीने परिसराचे लक्ष वेधून घेतले. शाळेचा विद्यार्थी वीरेंद्र चौगुले याने हलगी वादन करून उपस्थितांची विशेष दाद मिळविली.
विद्यार्थ्यांनी ज्ञान सतत अद्ययावत ठेवावे – डॉ. अजितकुमार पाटील
केंद्र शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञान सतत अद्ययावत ठेवण्याचे आवाहन केले. चांगल्या सवयी जोपासाव्यात, उत्तम पुस्तकांचे वाचन करावे, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हावे आणि महाराष्ट्रातील एक चांगला अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगावे, असे त्यांनी सांगितले. जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर शाळेचे व समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असेही त्यांनी नमूद केले.
प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती शीला सोनुले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांतील हे यश प्रेरणादायी असून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पट वाढविण्यासाठी ते महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगितले. शाळेसाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
उपसभापती पूजा पोवार यांनी शाळेच्या १५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत शाळेने अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी, अशी सदिच्छा व्यक्त केली.
डॉ. डी. वाय. पाटील बालवाडीची सुसज्ज इमारत उभारणार
भागाचे नगरसेवक सचिन चौगले यांनी शाळेच्या शेजारील डॉ. डी. वाय. पाटील बालवाडी दिमाखदार स्वरूपात विकसित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या इमारतीच्या तळमजल्यावर ज्युनिअर केजी, पहिल्या मजल्यावर सिनियर केजी, तर त्यावरील मजल्यावर पद्मश्री डी. वाय. पाटील ग्रंथालय उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून स्वनिधी/सीएसआर स्वरूपात निधी उपलब्ध झाला असून आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, डॉ. संजय डी. पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. इमारत लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
नगरसेवक तथा प्राथमिक शिक्षण समिती सदस्य विनायक कारंडे यांनी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत मिळविलेले यश संपूर्ण बावडा परिसरासाठी अभिमानास्पद असून हा शाळेसाठी नवा विक्रम असल्याचे सांगितले.
शाळेला आवश्यक सुविधा व मदतीचे आश्वासन
प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून प्राथमिक शिक्षण समिती व प्रशासनाच्या माध्यमातून शाळेला आवश्यक भौतिक सुविधा आणि आर्थिक मदतीसाठी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी शालेय पोषण आहाराची पाहणी करून निर्धारित मानकांची तपासणी केली तसेच आवश्यक सूचना दिल्या.
शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी यांनी शाळेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत प्रशासनाकडून आवश्यक मदतीसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. समावेशित शिक्षण समन्वयक राजेंद्र आपुगडे यांनी समावेशित शिक्षण विभागाच्या विविध योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी त्याचा उपयोग करण्याचे आवाहन केले.
मान्यवरांची उपस्थिती
रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती शीला सोनुले, उपसभापती पूजा पोवार, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, समावेशित शिक्षण समन्वयक राजेंद्र आपुगडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभुदास दाभाडे, नगरसेवक सुभाष बुचडे, नगरसेवक सचिन चौगले, नगरसेवक विनायक कारंडे तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश नरुटे व अजित पोवार आदी उपस्थित होते.
मार्गदर्शक शिक्षकांचा विशेष सत्कार
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशामागे मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा ट्रॉफी, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यामध्ये डॉ. अजितकुमार पाटील, उत्तम शामराव कुंभार, उत्तम अण्णा पाटील, विद्या प्रशांत पाटील, दीपाली अमर भापकर, अमित दत्तात्रेय पोटकुले आणि आर. जी. कीर्तिकर यांचा समावेश होता.
याप्रसंगी बालवाडी मुख्याध्यापिका कल्पना पाटील आणि सहाय्यक शिक्षिका सावित्री काळे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अजितकुमार पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आर. जी. कीर्तिकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उत्तम कुंभार यांनी केले.
१५५ वर्षांच्या परंपरेत यशाचे नवे सुवर्णपान
मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११, कसबा बावडा ही केवळ एक शाळा नसून संस्कार, गुणवत्ता, परिश्रम आणि यशाची समृद्ध परंपरा जपणारे ज्ञानमंदिर आहे. १५५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या दैदिप्यमान यशाने शाळेच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले आहे.
या निमित्ताने सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे अभिनंदन करण्यात आले.