पन्हाळा प्रतिनिधी (शहाबाज मुजावर):
आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील गट क्रमांक ३८८ मधील शेतजमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी पन्हाळा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी दोन फिर्यादी दाखल झाल्या असून, दोन्ही गटांतील एकूण १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश आप्पासो सरनोबत यांनी अमर सुभाष सरनोबत यांच्यासह सात जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. शेतात वांग्याची रोपे लावत असताना लोखंडी फावडे व दगडाने मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेत तिघे जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
तर अमर सुभाष सरनोबत यांनी आप्पासो हिंदुराव सरनोबत यांच्यासह सात जणांविरुद्ध तक्रार केली आहे.
लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी विळ्याने डोक्यावर वार केल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पन्हाळा पोलिसांकडून जखमींचे वैद्यकीय अहवाल, घटनास्थळावरील पुरावे व साक्षीदारांचे जबाब घेऊन पुढील तपास सुरू आहे.