पन्हाळा प्रतिनिधी, शहानवाज मुजावर
आळवे (ता. पन्हाळा) येथे घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला आणि घरात झोपलेल्या ८० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे फुलांचे गंठण जबरदस्तीने काढून लंपास केले. ही घटना १७ सप्टेंबर रोजी पहाटे १ ते ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळवे येथील प्रल्हाद संभाजी लाड यांच्या घरी त्यांची ८० वर्षीय आई हिराबाई बापू लाड झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या लोखंडी दरवाजाची काच फोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर दरवाजाची कडी काढून चोरटा घरात शिरला.
घरात झोपलेल्या हिराबाई लाड यांच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे फुलांचे गंठण चोरट्याने जबरदस्तीने काढून घेतले. या सोन्याच्या दागिन्याची अंदाजे किंमत ७० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर चोरट्याने साक्षीदार सौरभ पाटील यांच्या घरातही अनधिकृतपणे प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०९(४), ३०९(५), ३०९(६), ३३१(२), ३३१(४), ३३१(६) व ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरी करणारा आरोपी अद्याप अज्ञात असून त्याचा शोध घेण्यासाठी पन्हाळा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक सरगर हे तपास करीत असून पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौकांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.