Wednesday, November 4, 2026
HomePoliticalगोकुळची सत्ता आणि अध्यक्ष निवडीचा पेच, महायुतीचा सतेज पाटलांवर पलटवार

गोकुळची सत्ता आणि अध्यक्ष निवडीचा पेच, महायुतीचा सतेज पाटलांवर पलटवार

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासंदर्भात (गोकुळ) सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर महायुतीने पत्रकार परिषदेद्वारे आक्रमक भूमिका मांडली आहे. आमदार सतेज पाटील यांनी मांडलेली चिंता ही लोकशाहीसाठी नसून स्वतःच्या राजकीय सोयीसाठी असल्याचा घणाघाती आरोप महायुतीकडून करण्यात आला आहे.

गोकुळमधील सद्यस्थिती आणि आकडेवारी

गोकुळच्या २५ संचालक निवडीमध्ये विरोधी आघाडीला (सतेज पाटील गट) १३, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या आहेत. यावर भाष्य करताना महायुतीने म्हटले की, एका जागेच्या काठावरच्या विजयावर संपूर्ण जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व असल्याचा आव सतेज पाटील यांनी आणू नये. अध्यक्ष निवडीसाठी आमची कोणतीही अडवणूक नाही, त्यांनी त्यांचा अध्यक्ष जरूर करावा, आम्ही विरोधकांची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत आहोत, असे महायुतीने स्पष्ट केले.

गणपूर्तीचा (Quorum) वाद आणि नियम

२५ संचालकांच्या मंडळात गणपूर्तीसाठी १४ संचालकांची आवश्यकता हा नियम निवडणुकीनंतर तयार झालेला नाही, असे सांगत महायुतीने स्पष्ट केले की, आमच्या १२ संचालकांना मतदारांनी आमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिले आहे. केवळ दुसऱ्या बाजूची गणपूर्ती पूर्ण व्हावी म्हणून आमच्या संचालकांनी उपस्थित राहणे, म्हणजे मतदारांच्या विश्वासाशी प्रतारणा करण्यासारखे आहे. “सतेज पाटील यांच्या बाजूचे दोन संचालक आम्हाला देऊन त्यांनी आमच्या अध्यक्ष निवडीला सहकार्य करावे का?” असा सवालही यावेळी विचारण्यात आला.

माध्यमांना आणि जनतेला आवाहन

सतेज पाटील समर्थकांकडून सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या चिथावणीखोर भाषेचा महायुतीने निषेध केला आहे. राजकीय मतभेदांना धमक्यांचे स्वरूप देण्याऐवजी लोकशाहीच्या चौकटीत चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत, यापुढे जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. गोकुळ ही कोणत्याही एका नेत्याची मालमत्ता नसून लाखो दूध उत्पादकांची संस्था आहे. त्यामुळे पत्रकारांनी कोणत्याही राजकीय दबावाला किंवा भावनिक आवाहनांना बळी न पडता वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular