पन्हाळा प्रतिनिधी : शहानवाज मुजावर
आसुर्ले (ता. पन्हाळा) येथे गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादाची तयारी सुरू असताना चुलीतील कोळसा बाजूला करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात दगडी फरशीने मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी सुरेश आनंदा पाटील (रा. माळवाडी गल्ली, आसुर्ले) यांच्याविरुद्ध पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २१) दुपारी साडेतीनच्या सुमारास माळवाडी गल्लीतील विलास मोरबाळे यांच्या बोळात संयुक्त माळवाडी गणेश मंडळाच्या महाप्रसादाची तयारी सुरू होती. यावेळी अजय प्रसाद माळी (वय २४) हे शाकाहारी बिर्याणीला दम देण्यासाठी चुलीतील कोळसा एकत्र करीत होते. कोळशावर प्लास्टिक जळत असल्याने त्यांनी तो बाजूला केला.
याच कारणावरून सुरेश पाटील यांनी कोळसा बाजूला का केला, अशी विचारणा केली. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर पाटील यांनी शिवीगाळ करत जवळ पडलेली दगडी फरशी उचलून अजय माळी यांच्या डोक्यात दोन ठिकाणी मारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या मारहाणीत अजय माळी जखमी झाले. त्यांनी याबाबत पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरेश पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार भोसले करीत आहेत.