Thursday, September 24, 2026
HomeCrimeपत्ता विचारण्याच्या बहाण्याने शेळी चोरी; पन्हाळ्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने शेळी चोरी; पन्हाळ्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा

पन्हाळा प्रतिनिधी : शहानवाज मुजावर

पन्हाळा तालुक्यातील वाघवे परिसरातील सुर्वेवाडी डोंगरमाळ येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका शेतकऱ्याचे सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे बकरे चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मधुकर हिंदुराव निकम (वय ६३, रा. निकमवाडी, ता. पन्हाळा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास निकम हे शेळ्या व बकरे चारण्यासाठी वाघवे येथील सुर्वेवाडी डोंगरमाळ परिसरात गेले होते.

यावेळी मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम तेथे आले. त्यांनी निकम यांच्याशी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने संवाद साधला. याच दरम्यान निकम यांची नजर चुकवून त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाचे, अंगावर कोणतेही डाग नसलेले, लांब कानाचे व शिंगे नसलेले बकरे दोघांनी मोटारसायकलवर घेतले आणि तेथून पसार झाले.

चोरीस गेलेल्या बकऱ्याचे वजन अंदाजे ४० ते ४२ किलो असून त्याची किंमत सुमारे ३५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संशयित दोघांनी काळ्या रंगाचे शर्ट परिधान केले होते. त्यापैकी एका इसमाची दाढी वाढलेली असल्याचेही पोलिसांना सांगण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक फौजदार नाईक करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular