कळे : बाजार भोगाव मार्गावरील कळे बाजारपेठेत महालक्ष्मी बेकरीला आग लागून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. बुधवारी (ता. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बेकरीतील साहित्य, फ्रीजसह अन्य वस्तू जळून खाक झाल्या. नागरिकांनी वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणल्याने शेजारील दुकानांना आगीची झळ बसली नाही. अजय कृष्णात देसाई यांची बाजारपेठेत महालक्ष्मी बेकरी आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर रात्री फिरण्यासाठी आलेल्या महिलांना दुकानातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी साक्षी जितेंद्र कालेकर यांनी अजय देसाई यांचे चुलत भाऊ सतीश देसाई यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून दुकानातून धूर येत असल्याची माहिती दिली. दरम्यान, पनुत्रे (ता. पन्हाळा) येथील सखाराम भिकाजी मोरे हे पुनाळ येथे मिरवणुकीसाठी ट्रॅक्टर घेऊन जात होते. त्यांना बेकरीला आग लागल्याचे दिसून आले. आग आजूबाजूच्या दुकानांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने त्यांनी शेजारील दुकानदार मनोज झुरे यांच्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच वायरमन विनायक तडुलकर (चिंचवडे) यांनी तत्परतेने घटनास्थळी उपस्थित राहून वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर मनोज झुरे यांच्या बोअरवेलला पाईप जोडून नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझविली. नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. काही मिनिटे उशीर झाला असता तर आग आजूबाजूच्या दुकानांपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. आगीत बेकरीतील साहित्य, फ्रीज व अन्य वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.