कोल्हापूर:( प्रतिनिधी):
निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शासनाने मोठा अन्याय केला आहे. जिल्ह्यातील अत्यंत कमी पाऊस झालेल्या शाहूवाडी, हातकणंगले, कागल, शिरोळ आणि करवीर या पाच तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या अधिकृत यादीतून वगळण्यात आल्यामुळे शेतकरी कमालीचे आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना करपलेले सोयाबीन व भात पीक प्रत्यक्ष निवेदनासोबत देण्यात आले व या तालुक्यांचा तातडीने दुष्काळी यादीत समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, चालू वर्षी या पाचही तालुक्यांमध्ये अत्यंत कमी व अल्प पाऊस झाला आहे. यामुळे खरीप पिके पूर्णपणे वाया गेली असून भूजल पातळी कमालीची खालावली आहे. गावात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कागदोपत्री आकडेवारी काहीही सांगत असली, तरी प्रत्यक्ष जमिनीवर पिकांची धूळधाण झाली आहे. अशा विदारक परिस्थितीतही या तालुक्यांना दुष्काळी यादीतून वगळणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.
शासनाकडून ‘ट्रीगर १’ अंतर्गत दुष्काळी तालुके जाहीर करताना संपूर्ण तालुका एक घटक मानला जातो. मात्र, संघटनेने तालुकाऐवजी महसूल मंडळनिहाय (Circle-wise) व गावनिहाय प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्याची मागणी केली आहे. ज्या गावांमध्ये पावसाचा खंड २५ दिवसांपेक्षा जास्त पडला आहे आणि उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे, अशा सर्व बाधित गावांचा समावेश दुष्काळी यादीत करावा, अशी आग्रही मागणी स्वाभिमानीने केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून महसूल विभागामार्फत वस्तुनिष्ठ पाहणी (नजरअंदाज व अंतिम पैसेवारी) करून शासनाकडे तातडीने शिफारस करावी, अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. जर शासनाने यावर तातडीने निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पोवार , धनाजी पाटील , डॅा. बाळासाहेब पाटील , बाजीराव पाटील , विशाल चौगुले , अरूण मगदूम , पुरंदर पाटील , विक्रम पाटील , सौरभ शेट्टी , राजगोडा पाटील ,सुरेश म्हाऊंटकर , राजू वडाम यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.