Monday, October 5, 2026
HomeHealth & Fitnessसी. पी. आर. मध्ये एकाच दिवशी तीन TAVI प्रक्रिया यशस्वी, शासकीय आरोग्य...

सी. पी. आर. मध्ये एकाच दिवशी तीन TAVI प्रक्रिया यशस्वी, शासकीय आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा टप्पा

कोल्हापूर, दि. ५:
छाती न उघडता हृदयाची झडप बदलण्याच्या अत्याधुनिक Transcatheter Aortic Valve Implantation (TAVI) उपचारपद्धतीत छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाने महत्त्वपूर्ण यश मिळविले आहे. रुग्णालयात एकाच दिवशी तीन ज्येष्ठ रुग्णांवर TAVI प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. विशेष म्हणजे, तिन्ही रुग्णांमध्ये Self-Expandable Valve चा वापर करण्यात आला. महाराष्ट्राच्या शासकीय आरोग्य व्यवस्थेतील ही उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.

या तिन्ही रुग्णांमध्ये ८२ वर्षीय पुरुष आणि ८० वर्षीय दोन महिलांचा समावेश आहे. तिन्ही रुग्णांना वयोमानानुसार हृदयातील महत्त्वाची महाधमनी झडप (Aortic Valve) अरुंद व कडक होण्याचा गंभीर आजार—Severe Aortic Stenosis होता. त्यांना चालताना दम लागणे, छातीत दुखणे, चक्कर येणे अथवा बेशुद्ध पडणे तसेच पायांना सूज येणे अशी लक्षणे होती. त्यापैकी दोन रुग्णांना उच्च रक्तदाब व मधुमेह यांसारख्या सहव्याधी होत्या.

रुग्णांची तपासणी, निदान आणि उपचाराचे नियोजन CPRच्या हृदयरोग विभागामार्फत करण्यात आले. हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अक्षय बाफना यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांचे मूल्यांकन करण्यात आले. वाढते वय आणि पारंपरिक ओपन-हार्ट शस्त्रक्रियेशी संबंधित संभाव्य धोके लक्षात घेऊन रुग्णालयाच्या बहुविशेषज्ञ Heart Team ने TAVI उपचाराचा निर्णय घेतला.

□ पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी आशेचा किरण…..!
CPR शासकीय रुग्णालयात एकाच दिवशी तीन TAVI प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याने अत्याधुनिक हृदयविकारावरील उपचार केवळ मोठ्या खासगी रुग्णालयांपुरते मर्यादित न राहता शासकीय आरोग्य व्यवस्थेतूनही सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होऊ शकतात, हे अधोरेखित झाले आहे.
विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ज्येष्ठ रुग्णांसाठी TAVIसारखा आधुनिक व जीवनदायी उपचार मोफत उपलब्ध होणे ही महत्त्वाची बाब आहे. CPRमधील TAVI कार्यक्रमामुळे भविष्यात पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील गरजू रुग्णांना अत्याधुनिक, कमीतकमी आक्रमक आणि जीवनदायी हृदय उपचार उपलब्ध होण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.
□ मांडीच्या रक्तवाहिनीतून हृदयापर्यंत झडप……!
TAVI ही कमीतकमी त्रासाची आधुनिक उपचारपद्धती असून, यामध्ये पारंपरिक शस्त्रक्रियेप्रमाणे छाती उघडण्याची गरज भासत नाही. मांडीच्या रक्तवाहिनीतून कॅथेटरच्या साहाय्याने कृत्रिम हृदयझडप हृदयापर्यंत नेऊन खराब झालेल्या Aortic Valveच्या जागी नवीन झडप बसविण्यात येते.
तिन्ही रुग्णांमध्ये Transfemoral route द्वारे साधारण ६ ते ७ मिमी व्यासाच्या रक्तवाहिनीतून झडप हृदयापर्यंत नेऊन यशस्वीपणे प्रत्यारोपित करण्यात आली. तिन्ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आणि कोणत्याही रुग्णाला ओपन-हार्ट शस्त्रक्रियेची आवश्यकता भासली नाही.

□दोन रुग्ण प्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चालू लागले आणि तिसऱ्या दिवशी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तिसऱ्या रुग्णाच्या हृदयाभोवती प्रक्रियेनंतर सौम्य प्रमाणात द्रव साचला. त्यावर Heart Teamच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर सहाव्या दिवशी या रुग्णाला सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले.

□ १६ ते १८ लाखांचा उपचार मोफत…..!
खासगी रुग्णालयात TAVI उपचारासाठी साधारण १६ ते १८ लाख रुपये खर्च येऊ शकतो. मात्र SHAS Corpus Fund अंतर्गत मिळालेल्या आर्थिक सहाय्यामुळे या तिन्ही रुग्णांवर सी. पी. आर. शासकीय रुग्णालयात हा अत्याधुनिक उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आला. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्येष्ठ रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या उपचार प्रक्रियेत डॉ. अक्षय बाफना यांच्या नेतृत्वाखाली डॉ. पाटील, डॉ. मुल्ला व डॉ. देवरे (Cardiac Surgeons), डॉ. मिसाळ (HOD, Anaesthesia) तसेच ज्येष्ठ हृदयरोग शल्यविशारद डॉ. कोळे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने उपचार करण्यात आले.

या यशस्वी उपक्रमासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अधिष्ठाता डॉ. सदानंद बिसे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. मदाने यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच डॉ. अक्षय बाफना यांच्या नेतृत्वाखालील Cardiovascular Team, डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी श्री. जगताप, श्री. जयदीप तसेच Relisys टीमचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular