कोल्हापूर : मोहन कांबळे:|
“सण आणि उत्सव हे केवळ धार्मिक विधी नसून ते आपल्या निसर्गाशी आणि लोकजीवनाशी घट्ट जोडलेले आहेत. आपल्या अवतीभवती सहज उपलब्ध असलेल्या, पण सध्या दुर्लक्षित राहिलेल्या रानभाज्या आणि त्यांचे औषधी उपयोग प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी केले.
मनपा लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या प्रसंगी चौगुले यांनी, महाराष्ट्र शासनाने यावर्षी इयत्ता तिसरीच्या अभ्यासक्रमामध्ये विशेष समाविष्ट केलेल्या रानभाज्यांची ओळख करून देत त्यांच्या बहुविध उपयोगांची प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली.
निसर्गपूरक परंपरांचे प्रात्यक्षिक
दररोजच्या पूजेत व धार्मिक कार्यात वापरले जाणारे हळद-कुंकू, अष्टगंध आणि विविध खाद्यपदार्थांमधील रंग कोणतेही कृत्रिम घटक न वापरता घरच्या घरी नैसर्गिक घटकांपासून कसे तयार करावेत, याचे आकर्षक प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या सण-उत्सवांचे स्वरूप निसर्गावर आधारित कसे आहे आणि मानवी जीवन निसर्गावर कसे परस्परावलंबी आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांसह पटवून दिले. दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या कृतींमधून पर्यावरणाचा ऱ्हास न करता त्याला हातभार कसा लावावा, याचे मोलाचे बारकावे त्यांनी पालकांना सांगितले. या कार्यशाळेच्या निमित्ताने पालकांनी यंदाच्या दसऱ्यातील नऊ दिवस निसर्गपूरक उपक्रम राबवण्याचा एकमुखी संकल्प केला.
१०० हून अधिक रानभाज्यांचे प्रदर्शन
कार्यशाळेच्या प्रांगणात १०० हून अधिक दुर्मिळ व उपयुक्त रानभाज्यांचे आकर्षक पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचा आणि मार्गदर्शनाचा शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक तद्वतच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता-पालकांनी लाभ घेतला.
शाळेच्या मुख्याध्यापिका नीता ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जोतिबा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजयकुमार देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक मांडले, तर कार्यक्रमाच्या शेवटी विजय सुतार यांनी आभार मानले. विशेष म्हणजे, या संपूर्ण उपक्रमाचे नियोजनबद्ध आणि उत्कृष्ट आयोजन इयत्ता तिसरीच्या शिक्षक व विद्यार्थी टीमने अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडले.