Friday, November 6, 2026
HomePoliticalगोकुळच्या शासकीय नियुक्त संचालकांच्या निर्णयाला पन्हाळा तालुका काँग्रेसचा विरोध शासन निर्णय...

गोकुळच्या शासकीय नियुक्त संचालकांच्या निर्णयाला पन्हाळा तालुका काँग्रेसचा विरोध शासन निर्णय कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

पन्हाळा प्रतिनिधी : शहानवाज मुजावर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळात शासन नियुक्त संचालक नेमण्याच्या शासन निर्णयाला पन्हाळा तालुका काँग्रेस कमिटीने तीव्र विरोध दर्शविला आहे. हा निर्णय सहकार क्षेत्रातील लोकशाही मूल्यांना बाधा आणणारा असून तो तातडीने मागे घेऊन कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पन्हाळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवास शंकर पाटील यांनी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सहायक निबंधक, पन्हाळा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्हा हा ‘सहकार पंढरी’ म्हणून ओळखला जातो. सहकारातून समाजाचा विकास व प्रगती साधण्याचा आदर्श येथे निर्माण झाला असून गोकुळ हे या विकासाचे सर्वोच्च मॉडेल आहे.
अशा परिस्थितीत गोकुळच्या राजकारणात शासनाकडून विनाकारण हस्तक्षेप करून गरज नसलेला सरकारी हस्तक्षेप लादणे सहकार क्षेत्राला घातक आहे. या निर्णयामुळे सहकाराच्या निवडणूक प्रणालीची, जनमताची आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
शासन नियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयाला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचा दावा करत, सहकार क्षेत्रातील लोकशाही प्रक्रियेला धक्का पोहोचविणारा हा निर्णय असल्याचे काँग्रेस कमिटीने म्हटले आहे. त्यामुळे सदर शासन निर्णय मागे घेऊन कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर पन्हाळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवास शंकर पाटील, सतीश भोसले पन्हाळा उपनगराध्यक्ष यांची स्वाक्षरी असून, तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular