मुंबई प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष सत्तेत असूनही लोकशाही वाचविण्यासाठी मोर्चे काढत आहे, ही राजकीय विसंगती असल्याची टीका करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. विशेषतः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील सत्तासंघर्षाचा संदर्भ देत त्यांनी भाजपच्या लोकशाहीविषयक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे गोकुळच्या राजकारणात सतेज पाटील गटाला नैतिक बळ मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज ठाकरे यांनी भाजपच्या लोकशाहीविषयक भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे की, भाजप हा खालपासून वरपर्यंत सत्तेत असलेला पक्ष आहे. तरीही लोकशाही वाचविण्यासाठी मोर्चे काढण्याची वेळ त्यांच्यावर येते, हे आश्चर्यकारक आहे. सत्ताधारी पक्षाने विरोधकांविरोधात लोकशाहीच्या रक्षणासाठी मोर्चा काढणे, हे जगातील एकमेव उदाहरण असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
गोकुळमधील संचालक मंडळाच्या निवडणुकीचा दाखला देत राज ठाकरे यांनी भाजपला थेट सवाल केला. भाजपच्या पॅनेलचे १२, तर सतेज पाटील यांच्या पॅनेलचे १३ संचालक निवडून आले. मतदारांनी बॅलेट मतदान पद्धतीने लोकशाही मार्गाने कौल दिला असताना सरकारकडून पाच संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्यामागे नेमका हेतू काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
खरोखरच लोकशाहीची काळजी असेल, तर बहुमताने निवडून आलेल्या संचालकांच्या संख्येवर परिणाम करणारा असा निर्णय घेतला नसता. गोकुळमध्ये सत्ता मिळवता आली नाही म्हणून भाजपने आपली तत्त्वे बाजूला ठेवली आणि दुसरीकडे लोकशाही वाचविण्याच्या नावाखाली मोर्चे काढले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
महाराष्ट्रात एकीकडे पाण्याचा भीषण दुष्काळ असताना भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा दुष्काळ पडल्याचे दिसत आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. सत्तेत असताना लोकशाही वाचविण्याच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे स्वतःच लोकशाहीचा गळा आवळायचा, अशी भाजपची भूमिका असल्याचे ते म्हणाले.
भाजपने रडीचा डाव खेळणे बंद करावे. गेल्या बारा वर्षांपासून भाजपला मिळालेला जनतेचा कौल विरोधी पक्षांनी स्वीकारला आणि सहन केला. आता देशातील जनता विरोधी पक्षांकडे झुकू लागली असेल, तर भाजपनेही लोकशाहीतील हा बदल स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.
गोकुळमधील सत्तासंघर्षाला राजकीय धार
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने १३ संचालक निवडून आणले, तर महायुतीच्या पॅनेलला १२ जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर सरकारी नामनिर्देशित संचालकांच्या नियुक्तीचा मुद्दा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेमुळे गोकुळमधील सत्तासंघर्षाला आणखी राजकीय धार मिळाली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे सतेज पाटील यांच्या भूमिकेला राजकीय पाठबळ मिळाल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

