Sunday, November 8, 2026
HomePoliticalठरावधारकांनीच गोकुळचा डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून वाचवले – खास....

ठरावधारकांनीच गोकुळचा डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून वाचवले – खास. धनंजय महाडिक यांचा सतेज पाटलांच्यावर हल्लाबोल

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापूरचे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधताना खासदार धनंजय महाडिक यांनी जोरदार टीका केली. माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहिती आहे. त्यांचा उन्माद आणि वक्तव्ये लोकांनी अनेकदा पाहिली आहेत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच गोकुळ दूध संघाचे ठरावधारकांनीच या संघाचे डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून संरक्षण केले, असा खळबळजनक दावा महाडिक यांनी केला.

गोकुळमध्ये सत्ता वाटपाबाबत सकारात्मक प्रस्ताव आला असता, तर त्यावर निश्चित विचार केला असता. मात्र, एकत्रित कारभार करण्याऐवजी केवळ आमचाच मॅनडेट आहे आणि तांत्रिक कारणांमुळे आम्हाला अडवले जात आहे, असा चुकीचा प्रचार करण्यात आला. सतेज पाटील हे फेक नरेटिव्ह तयार करण्यात तरबेज आहेत, अशी टीका महाडिक यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारची सुरुवातीपासून समन्वयाची भूमिका होती. आम्ही विरोधात बसणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. सत्ता किंवा अध्यक्षपदाची काही वर्षे वाटणी करून एकत्रित कारभार करण्याचा प्रस्ताव आला असता, तर त्यावर चर्चा झाली असती. मात्र, तसा कोणताही सकारात्मक प्रस्ताव देण्यात आला नाही, असेही महाडिक म्हणाले.

मोर्चाला किती लोक येणार, याबाबत शंका!

गोकुळच्या प्रश्नावरून उद्या काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबतही महाडिक यांनी प्रश्न उपस्थित केला. या मोर्चाला किती लोक सहभागी होतील, याबाबत मला शंका आहे. दिवाळीचा सण सुरू असताना नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही. अशा आंदोलनांचा व्यापार आणि व्यापाऱ्यांवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे कोल्हापूरकरांनी या सर्व बाबींचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी दहा लाख लोक एकत्र करण्याची घोषणा केली होती. त्याच धर्तीवर येथेही मोठ्या संख्येने लोक जमवण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. प्रत्यक्षात किती लोक सहभागी होतात, हे पाहावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

पराभूत उमेदवारांना शासकीय संचालकपद नाही!

गोकुळवर कोणाचा अध्यक्ष होणार, हे सध्या सांगता येणार नाही. महायुतीचा अध्यक्ष होईल की समविचारी आघाडीचा, हे आगामी घडामोडींवर अवलंबून आहे. गोकुळवर नियुक्त होणारे शासकीय संचालक अराजकीय असतील. पराभूत झालेल्या उमेदवारांपैकी कोणालाही संचालक म्हणून नियुक्त केले जाणार नाही, असे महाडिक यांनी स्पष्ट केले.

पाच वर्षांपूर्वीच्या गोकुळ निवडणुकीत मतदान न करणाऱ्या ठरावधारकांची यादी तयार करण्यात आली होती. त्यांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्यामुळे अनेक संचालक नाराज होते, असा आरोपही त्यांनी केला.

सरकार गोकुळच्या पाठीशी ठाम!

महाराष्ट्र सरकार गोकुळच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सरकारला गोकुळवर कब्जा करण्याची कोणतीही गरज नाही. गोकुळ दूध संघाची सकारात्मक वाटचाल व्हावी आणि हा संघ अधिक नावारूपाला यावा, यासाठी आमचा प्रयत्न राहील, असेही खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

गोकुळच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात महाडिक यांच्या या वक्तव्यामुळे सतेज पाटील विरुद्ध महायुती असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular