Sunday, November 8, 2026
HomePoliticalगोकुळमध्ये तज्ज्ञ संचालक नियुक्तीत महायुतीने टाकली अशी गुगली; राजकीय नावांना फाटा देत...

गोकुळमध्ये तज्ज्ञ संचालक नियुक्तीत महायुतीने टाकली अशी गुगली; राजकीय नावांना फाटा देत बाहेरील चेहऱ्यांना संधी!

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. गोकुळमध्ये चार तज्ज्ञ संचालक अर्थात स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याच्या हालचालींमुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. महायुतीकडून सुरुवातीला राजकीय क्षेत्रातील माजी संचालकांची नावे चर्चेत असताना अचानक राजकीय नावांना बाजूला ठेवून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना संधी देण्याची रणनीती आखण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

गोकुळमधील कोरमचा प्रश्न सोडवून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करण्यासाठी महायुतीकडून चार तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्याचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला होता. यासाठी शौमिका महाडिक, नावेद मुश्रीफ, बाळासाहेब खाडे आणि अशोक फराकटे या माजी संचालकांची नावे चर्चेत होती. मात्र, पराभूत उमेदवारांना मागील दाराने प्रवेश देऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांकडून होत होती.

या टीकेमुळे राजकीय प्रतिमेवर परिणाम होऊ नये, यासाठी महायुतीने राजकीय नावांऐवजी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांची निवड केल्याची चर्चा आहे.

कोणाची लागली वर्णी?तज्ज्ञ संचालक म्हणून पुढील नावांची चर्चा असून ती निश्चित मानली जात आहेत.

  • शिवाजीराव आडनाईक – बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, जिल्हा बँकेचे माजी शाखा व्यवस्थापक.

  • के. डी. पाटील (केनवडेकर) – सनदी लेखापाल (सी. ए.).

  • डॉ. प्रवीण हेंद्रे – वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ.

  • ॲड. प्रकाश पाटोळे (सांगली) – कायदेविषयक क्षेत्रातील तज्ज्ञ.

  • कृष्णा ठाकरे – दुग्ध विभागाचे अधिकारी, दुग्ध निबंधक.

मात्र, या नियुक्त्यांबाबत अधिकृत शासकीय परिपत्रक अद्याप जाहीर झालेले नसल्याने अंतिम अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

चार संचालकांना मतदानाचा अधिकार?या नियुक्त्यांमध्ये दुग्ध अधिकारी कृष्णा ठाकरे यांना वगळता अन्य चार तज्ज्ञ संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडीच्या वेळी या चार मतांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. हे चारही संचालक महायुतीच्या बाजूने मतदान करतील, असा महायुतीच्या नेत्यांना विश्वास असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राजकीय नावांना फाटा देण्यामागे काय गणित?गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून सतेज पाटील आणि समविचारी आघाडीने घेतलेल्या भूमिकेवर महायुतीकडून टीका केली जात आहे. दुसरीकडे, अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला विरोध झाल्यानंतर या विषयाची चर्चा राज्यभर पोहोचली. राहुल गांधी, राज ठाकरे यांच्यासह विविध राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनीही या प्रकरणात भूमिका मांडल्याने गोकुळचा सत्तासंघर्ष केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही.

या पार्श्वभूमीवर पराभूत राजकीय उमेदवारांना तज्ज्ञ संचालक म्हणून संधी देण्याऐवजी बँकिंग, वैद्यकीय, लेखा आणि कायदे क्षेत्रातील व्यक्तींना पुढे करून महायुतीने वेगळी रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.

गोकुळच्या सत्तासंघर्षात तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीमुळे नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे. आता या नियुक्त्यांना अधिकृत मान्यता कधी मिळते आणि अध्यक्ष निवडीच्या वेळी या चार मतांची नेमकी काय भूमिका राहते, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular