कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. गोकुळमध्ये चार तज्ज्ञ संचालक अर्थात स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याच्या हालचालींमुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. महायुतीकडून सुरुवातीला राजकीय क्षेत्रातील माजी संचालकांची नावे चर्चेत असताना अचानक राजकीय नावांना बाजूला ठेवून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना संधी देण्याची रणनीती आखण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
गोकुळमधील कोरमचा प्रश्न सोडवून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करण्यासाठी महायुतीकडून चार तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्याचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला होता. यासाठी शौमिका महाडिक, नावेद मुश्रीफ, बाळासाहेब खाडे आणि अशोक फराकटे या माजी संचालकांची नावे चर्चेत होती. मात्र, पराभूत उमेदवारांना मागील दाराने प्रवेश देऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांकडून होत होती.
या टीकेमुळे राजकीय प्रतिमेवर परिणाम होऊ नये, यासाठी महायुतीने राजकीय नावांऐवजी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांची निवड केल्याची चर्चा आहे.
कोणाची लागली वर्णी?तज्ज्ञ संचालक म्हणून पुढील नावांची चर्चा असून ती निश्चित मानली जात आहेत.
-
शिवाजीराव आडनाईक – बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, जिल्हा बँकेचे माजी शाखा व्यवस्थापक.
-
के. डी. पाटील (केनवडेकर) – सनदी लेखापाल (सी. ए.).
-
डॉ. प्रवीण हेंद्रे – वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ.
-
ॲड. प्रकाश पाटोळे (सांगली) – कायदेविषयक क्षेत्रातील तज्ज्ञ.
-
कृष्णा ठाकरे – दुग्ध विभागाचे अधिकारी, दुग्ध निबंधक.

