-
कोल्हापूर : समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद फुलविण्याच्या उद्देशाने “फ्री विंग्ज फाऊंडेशन”आणि इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक दिवा माणुसकीचा’ हा सामाजिक उपक्रम द्वारकानाथ कपूर विद्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांमधील गरजू आणि होतकरू,एकल पालकत्व असलेल्या विद्यार्थ्यांना दिवाळीचे साहित्य, फटाके,मिठाई आणि नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. भेटवस्तू मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद आणि उत्साहाने कार्यक्रमाला भावनिक उंची प्राप्त झाली. समाजातील प्रत्येक घटकाला सणाचा आनंद अनुभवता यावा, या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला द्वारकानाथ कपूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मीनाक्षी मगदूम, सी. एस. पाटील सर, मयूर कांबळे सर,जरगनगर विद्यालयाचे संजयकुमार देसाई सर, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या सेक्रेटरी स्नेहल जाधव, अमृता पारेख तसेच क्लबचे इतर सदस्य उपस्थित होते.
फ्री विंग्ज फाऊंडेशनच्या संयोगिता महाजन, रोहिणी शिंदे, स्नेहा लोखंडे, संगीता चांदणे यांच्यासह संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना संयोगिता महाजन यांनी, “दुसऱ्याच्या दुःखाची नाळ ओळखणे म्हणजेच खरे जीवन जगणे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही जाणीव प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. समाजातील गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी आपण आपापल्या परीने योगदान दिले, तरच सामाजिक बांधिलकीचा खरा अर्थ साध्य होईल.तुम्ही मुलं ही आमची जबाबदारी आहे, पुढे तुम्हीही मोठे होऊन समाजिकभान जपावे,” असे प्रतिपादन केले.इनर्व्हील क्लबच्या शीतल गुळवणी यांनी,”खरा भारत ही मुले असून या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही बांधील असू,आम्ही नेहमीच सहकार्याची बांधिलकी जपू.”असे प्रतिपादन केले.
एकल महिलांचे पुनर्वसन, बालहक्क, शिक्षण सहाय्य आणि सामाजिक सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या दोन्ही संस्थांनी एकत्र येत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा केलेला हा प्रयत्न उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला. योगेश जाधव,अजित लिंगम यांनी मोलाचे सहकार्य केले.
माणुसकीचा एक छोटासा दिवा अनेकांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करू शकतो, याची प्रचिती या उपक्रमातून आली.

