पंढरपूर:
पंढरपूरमध्ये उद्या (दि. १२ एप्रिल) मोठी राजकीय घडामोड घडणार असून, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके आणि भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असून विविध हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, मित्रपक्ष भाजपने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यावेळी जाणाऱ्या मार्गावरील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये कुंकू, फुले आणि नारळ अर्पण करत प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध नोंदवण्यात आला.
निधी मिळविण्यात होणाऱ्या अडचणींना कंटाळून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख Bhagirath Bhalke, नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि अनिल सावंत यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
या घडामोडीनंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील काही नगरसेवकांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची भेट घेत भालके यांच्याशी आमचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. “तीर्थक्षेत्र विकास आघाडी आमची असून व्हीप बजावण्याचा अधिकार इतर कोणालाही नाही,” असे निवेदन त्यांनी दिले.
मात्र, या विरोधानंतर लगेचच अनिल सावंत यांनी संबंधित नगरसेवकांना माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घडवून आणली. या भेटीत भालके अनुपस्थित असल्याने नगरसेवकांचा अंतिम निर्णय काय, याबाबत संभ्रम कायम आहे.
एकूणच, भालके आणि सावंत यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पंढरपूरच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता असून, आगामी काळात याचे पडसाद स्थानिक सत्तासमीकरणांवर उमटण्याची चिन्हे आहेत.