नाशिक : महिलांची फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेल्या भोंदू बाबाचा अशोक खरात याच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. सोमवारी पहाटेपासून सुरू झालेल्या छापेमारीदरम्यान तब्बल १३ तास चौकशी करण्यात आली असून, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
ईडी आणि आयकर विभागाच्या पथकाने खरातच्या निवासस्थानासह एकूण ११ ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत त्याची आलिशान मर्सिडीज बेंझ गाडी जप्त करण्यात आली असून, विविध बँक खात्यांतील सुमारे २ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे.
तपासादरम्यान १०० हून अधिक महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले असून, त्यामधून जवळपास १० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा तपशील समोर आल्याची माहिती आहे. तसेच काही खात्यांमधून ५० ते ६० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ईडीने खरातशी संबंधित शिवनिका संस्थेच्या कार्यालयातूनही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. मिरगाव येथील कार्यालय, तसेच इतर आर्थिक व्यवहारांशी संबंधित ठिकाणीही चौकशी करण्यात आली. मंदिरातील पुजारी आणि कर्मचाऱ्यांचीही विचारपूस करण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान पुण्यातील एका संबंधित व्यक्तीच्या घरातून ४२ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. सोलापूरसह विविध ठिकाणी कोट्यवधींच्या जमिनी खरेदी केल्याचा तपास सुरू आहे.
ईडीचा तपास मुख्यतः मनी लॉन्डरिंग, बेनामी मालमत्ता आणि आर्थिक गैरव्यवहार यावर केंद्रित असून, पोलिस आणि एसआयटीकडून ब्लॅकमेल, शोषण आणि डिजिटल पुरावे यासंबंधी स्वतंत्र तपास सुरू आहे.
या संपूर्ण कारवाईमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले असून, आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.