पन्हाळा प्रतिनिधी : पन्हाळगडकोट किल्ल्यावरील टेहाळणी बुरुज परिसरात झालेल्या कथित अतिक्रमणाविरोधात भारतीय दलित महासंघाच्या वतीने गुरुवार, दि. २८ मे २०२६ रोजी पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेसमोर “बोंब मारो ठिय्या आंदोलन” करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे कार्यकर्ते श्रीकांत कांबळे (आप्पा) यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
निवेदनानुसार, पन्हाळगडावरील हॉटेल व्हॅली व्यु ग्रँडच्या मालकाने टेहाळणी बुरुज परिसरात पुरातत्त्व विभाग, वनविभाग आणि नगरपालिका क्षेत्रात अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच विश्वरत्न Dr. B. R. Ambedkar यांच्या मालकी हक्काच्या जमिनीवरही अतिक्रमण करून गैरवापर सुरू असल्याचे म्हटले आहे.
इतिहासाची साक्ष असलेल्या टेहाळणी बुरुजावर सांस्कृतिक कार्यक्रम आणि पार्ट्या आयोजित केल्या जात असून त्यामुळे ऐतिहासिक स्थळाचा अवमान होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक, पर्यटक, इतिहास संशोधक, इतिहासप्रेमी तसेच शिवकालीन इतिहासाची माहिती देणाऱ्या मार्गदर्शकांना टेहाळणी बुरुज परिसरात जाण्यास मज्जाव केला जात असल्याचे निवेदनात नमूद आहे.
भारतीय दलित महासंघाच्या वतीने यापूर्वी २६ जानेवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनानंतर प्रशासनाने संबंधित अतिक्रमण एका महिन्यात हटवून हॉटेल मालकावर कारवाई करण्याचे तसेच संबंधित जमिनीला संरक्षणात्मक कंपाऊंड उभारण्याचे लेखी आश्वासन दिल्याचा दावा संघटनेने केला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासन संबंधित हॉटेल चालकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुरातत्त्व, वन, महसूल व नगरपालिका प्रशासनाने संबंधित अतिक्रमण तातडीने हटवून हॉटेल मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी तसेच प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणाचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे श्रीकांत कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.
या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी शाहूवाडी-पन्हाळा विभाग, पन्हाळा नगरपरिषद मुख्याधिकारी, वनाधिकारी पन्हाळा, पुरातत्त्व कार्यालय आणि पन्हाळा पोलीस ठाण्यास देण्यात आल्या आहेत.