प्रयाग चिखली वार्ताहर:
कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील रजपुतवाडी येथील हॉटेल ग्रीन फील्ड च्या समोरील कचरा कोंढाळ्याला लावलेल्या आगीमुळे झाडाला आग लागून आणखी एक वटवृक्ष आगीने भस्मसात होऊन कोसळल्याची घटना आज गुरुवारी सकाळी घडली दरम्यान पडलेल्या झाडाखाली सापडलेले मोपेडस्वार बाप- लेक आश्चर्यकारकरीत्या बचावले.
हॉटेल ग्रीन फिल्डच्या प्रशासनाने कोंढाळ्याला आग लावल्याचा आरोप येथील उपसरपंच राजेंद्र कोळी यांनी केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी देखील केली आहे.
महामार्गावरील रजपुतवाडी येथे ग्रीन फिल्ड हॉटेल आहे या हॉटेलचा कचरा रस्त्याच्या बाजूला टाकलेला आहे. कचऱ्याच्या ढीगाला गेल्या दोन दिवसापासून आग लावण्यात आलेली आहे. कचऱ्याला लागलेली आग झाडाला लागली आणि गेले दोन दिवसापासून हे झाड धुमसत आहे. हॉटेल प्रशासनाला देखील याबाबत कल्पना दिली होती मात्र झाडाची आग विजवण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत आज गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या च्या सुमारास हे वडाचे झाड खोडाला लागलेल्या आगीमुळे रस्त्यावर कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली.
थोड्यावेळाने महापालिकेच्या जवानानी झाडाची विल्हेवाट लावली.
प्रचंड रहदारी असलेल्या या रस्त्यावर पेटणारे झाड पडून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. सुदैवाने मोठा अपघात घडला नसला तरी सोनतळी येथील मोपेड स्वार मारुती पोवार व त्यांची मुलगी मृणाल पोवार यांच्या गाडीवर भली मोठी फांदी कोसळली त्यामुळे त्यांना मुक्का मार लागला आहे नशिबाने बाप – लेक या अपघातातून आश्चर्यकारक रित्या बचावले. हॉटेल प्रशासनाच्यावतीने कचरा कोंढाळ्याला लागलेल्या आगीने आणखी एक झाड मात्र आगीच्या भक्षस्थानी पडले.
दरम्यान काही काळाने येथील वाहतूक सुरळीत झाली.