पुणे, दि. २९ (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिला.
यापूर्वी २५ जून रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले होते. त्यानंतर शिक्षेवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सोमवारी न्यायालयाने हा गुन्हा “दुर्मिळातील दुर्मिळ” (Rarest of Rare) स्वरूपाचा असल्याचे नमूद करत मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली.
या प्रकरणात गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत तपास, सुनावणी आणि निकालाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, राज्यातील खून व लैंगिक अत्याचाराच्या खटल्यांमध्ये इतक्या जलदगतीने निकाल लागलेले हे पहिले प्रकरण ठरल्याचे मानले जात आहे.
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी शिक्षेबाबत युक्तिवाद करताना सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांचा दाखला देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. गुन्ह्यातील क्रूरता, पीडितेचे असहाय्य वय, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि समाजावर झालेला गंभीर परिणाम या बाबींचा न्यायालयानेही विचार केला.
निकाल देताना न्यायालयाने नमूद केले की, आरोपीने स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी निष्पाप बालिकेवर अमानवी अत्याचार करून तिची हत्या केली. पीडिता स्वतःचे संरक्षण करू शकत नव्हती. आरोपीचे वय हा दयेचा आधार ठरू शकत नाही. अशा गुन्ह्यांमुळे समाज हादरतो आणि कायद्यावरील विश्वास टिकवण्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना, आरोपीचा गंभीर गुन्हेगारी पूर्वइतिहास, गुन्ह्याचे नियोजन, अत्यंत क्रूर पद्धतीने केलेली हत्या आणि समाजात निर्माण झालेली भीती या सर्व बाबी लक्षात घेऊन मृत्युदंडाची शिक्षा योग्य असल्याचे स्पष्ट केले.
या निकालानंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.