कोल्हापूर, दि. 30 : कणेरी (ता. पन्हाळा) येथील शेतजमीन खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सचिन नारायण पाटील (वय 43, रा. 1924, बी वॉर्ड, संभाजीनगर, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. तर आनंदा बाबू पाटील (रा. कणेरी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 318(4) अन्वये गुन्हा क्रमांक 134/2026 दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 सप्टेंबर 2013 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आरोपीने कणेरी येथील गट क्रमांक 169 व 205 मधील 0.10 आर क्षेत्राची शेतजमीन खरेदी करून देण्याचे आश्वासन फिर्यादीला दिले. त्यासाठी चेक व रोख स्वरूपात एकूण 5 लाख रुपये स्वीकारले. मात्र, जमीन खरेदी करून दिली नाही तसेच वारंवार मागणी करूनही रक्कम परत केली नसल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या फिर्यादीवरून पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार एम. एम. नाईक करत आहेत.