कोल्हापूर, दि. 30 : केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 4 डिसेंबर 2018 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 1 एप्रिल 2019 पासून नव्याने नोंदणी होणाऱ्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांनाही HSRP बसविण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. या प्रक्रियेची अंतिम मुदत 30 जून रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे अद्याप HSRP न बसविलेल्या वाहनांवर केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 50 तसेच मोटार वाहन अधिनियमातील कलम 177 अन्वये 1 जुलै पासून काटेकोर कारवाई करण्यात येणार आहे.
मात्र, ज्या वाहनधारकांनी HSRP बसविण्यासाठी आगाऊ नोंदणी (Appointment) केली आहे, अशा वाहनांना अंमलबजावणीपासून सूट देण्यात येणार आहे. अद्यापही ज्यांनी HSRP बसविलेली नाही त्यांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी तातडीने HSRP बसवून घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयानमार्फत कळविण्यात आले आहे.