Wednesday, July 1, 2026
HomeCrimeकोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटवर एलसीबीचा छापा; चौघे ताब्यात, सोनोग्राफी मशीनसह 9.81...

कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटवर एलसीबीचा छापा; चौघे ताब्यात, सोनोग्राफी मशीनसह 9.81 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर, दि. १ जुलै : कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या आणि अन्य साहित्य असा एकूण 9 लाख 81 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथक तयार केले होते.

तपासादरम्यान अनिल टिपुगडे (रा. भोगावती) हा बेकायदेशीर गर्भलिंग निदान करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाचे अधिकारी, पीसीपीएनडीटी कायदा सल्लागार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एका गर्भवती महिलेला बनावट ग्राहक म्हणून पाठवून सापळा रचण्यात आला.

भोगावती साखर कारखाना कॉलनीतील एका घरात छापा टाकला असता गर्भलिंग निदान सुरू असतानाच पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. तपासात गर्भलिंग निदानासाठी 20 हजार रुपये, तर गर्भपातासाठी स्वतंत्र 15 हजार रुपये घेत असल्याचे समोर आले.

कारवाईत ताब्यात घेण्यात आलेले संशयित पुढीलप्रमाणे आहेत –

  • महेश सुबराव पाटील (रा. शिरसे, ता. राधानगरी)

  • अनिल पलाडा टिपुगडे (रा. भोगावती, ता. करवीर)

  • सुनिल प्रकाश पाटील (रा. शिरसे, ता. राधानगरी)

  • श्रीमंत तानाजी पाटील (रा. परिते, ता. करवीर)

आरोपींकडून एक सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या आणि अन्य साहित्य असा 9.81 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना करवीर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय खुपिरे येथील वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पीसीपीएनडीटी कायदा सल्लागार तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular