ऊत्तूर, दि. २२:
सन १९९९ पासून सेवाभावाच्या भावनेने मी विशेष सहाय्य खाते मागून घेतले. या योजनेतील अनेक कडक नियम व अटी बदलून गोरगरिबांच्या सेवा कार्याला मी सुरुवात केली. या योजनेतील वृद्ध, निराधार, विधवा, परितक्त्या, दिव्यांग हे सगळे लाभार्थी मला अंतकरणापासून आजही आशीर्वाद देत आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी सल्लग सहावेळा विधानसभेला निवडून आलो आणि नऊवेळा मंत्री झालो. त्यांचे माझ्यावर अनंत ऋण आहेत. मी कितीही जन्म घेतले तरी या ऋणातून उतराई होणे अशक्यच आहे, असे भावनिक प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
उत्तूर (ता. आजरा) येथे उत्तूर विभागातील ४५६ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजुरीपत्रांचे वाटप कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सुनील दिवटे होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, १९८०-८१ साली बॅरिस्टर ए. आर. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना संजय गांधी निराधार योजना सुरू झाली. गोरगरिबांसाठी ही योजना अतिशय चांगली आहेच. दरम्यान; यामधील अटी मात्र अडचणीच्या होत्या. दरम्यान; १९९९ साली विशेष सहाय्य खाते माझ्याकडे आले आणि या योजनेमध्ये अमुलाग्र बदल केला. या योजनेतील सर्व कडक अटी शिथिल केल्या आणि ही योजना खऱ्या अर्थाने निराधारांची, गोरगरिबांची आणि दिव्यांगांची केली. या योजनेतील २१ हजारांची उत्पन्न मर्यादा ५० हजार करावी, ६५ वर्षांवरील वयोमर्यादा ६० वर्षांवर आणावी, दरमहा १,५०० असलेली पेन्शन दरमहा २,००० करणे यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
ते पुढे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये अजूनही काही पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी केलेली नाही. या कामामध्ये तहसीलदार कार्यालय आणि कृषी विभागाने लक्ष घालून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करावे, जेणेकरून कर्जमुक्तीचा लाभ संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळेल. यामध्ये आजरा तालुका संजय गांधी निराधार समितीनेही पुढाकार घेऊन तहसीलदार कार्यालयाच्या मदतीने गावनिहाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. त्यासाठी लागेल ते सहकार्य नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशन करेल.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, आंबेओहोळ प्रकल्पाच्या स्वेच्छा पुनर्वसनग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. उत्तूर विभागातील सर्वच पानंद रस्ते ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत व पांदण रस्ते योजने’अंतर्गत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ आलेली आहे. ही योजना जिल्हाभर राबवण्यासाठी केडीसीसी बँकेने पुढाकार घेतला आहे. याचा लाभ सर्वच घरगुती वीज ग्राहकांनी घेऊन वीज बिल शून्य करण्यासाठी सहभागी व्हा.
*सुनील दिवटे हाडाचा सेवाभावी कार्यकर्ता……!*
संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्री. सुनील दिवटे हे एक सच्चे आणि हाडाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. याआधीही त्यांचे हे सेवाकार्य सुरूच होते. त्यामुळे या योजनेचे अध्यक्षपद त्यांनाच द्यावे, असे मला सतत वाटायचे. त्यांनी या पदाचा प्रभार घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच धडाडीने हे गोरगरिबांचे पुण्याईचे काम सुरू केले आहे.. त्यांना शासनाच्या महसूल विभागानेही चांगली साथ दिली आहे.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, आजरा कारखान्याचे माजी चेअरमन वसंतराव धुरे, आजरा तहसीलदार समीर माने, संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष सुनील दिवटे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, आजरा पंचायत समिती सभापती जयश्री गाडे, आजरा पंचायत समिती सदस्य विकास चोथे, नायब तहसीलदार विकास कोलते, माजी उपसरपंच समिक्षा देसाई, मारुतीराव घोरपडे, संभाजीराव तांबेकर, संजय येजरे, दीपक देसाई, राजेंद्र मुरकुटे, सुधीर सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांचीही मनोगते झाली. स्वागत व प्रास्ताविक आजरा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सुनील दिवटे यांनी केले. सूत्रसंचालन सुधाकर मुळीक यांनी केले. आभार अंबाजी गुरव यांनी मानले.

