Sunday, September 13, 2026
HomePoliticalपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जिल्ह्यातील 3 हजार 833...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जिल्ह्यातील 3 हजार 833 शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

कोल्हापूर, दि. 11  : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत दुसरी यादी जाहीर झाली असून यामध्ये जिल्ह्यातील 3 हजार 833 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आधार प्रमाणीकरण दुसरी यादी विभागनिहाय पुढीलप्रमाणे नागपूर -34 हजार 520, अमरावती 71 हजार 796, छत्रपती संभाजीनगर 1 लाख 95 हजार 899, नाशिक 25 हजार 471, कोकण 4 हजार 811, पुणे 23 हजार 117 असे एकूण 3 लाख 55 हजार 614 शेतकऱ्यांचा दुसऱ्या यादीमध्ये समावेश आहे. तर पुणे विभागांतर्गत कोल्हापूर- 3 हजार 833, पुणे-6 हजार 648, सांगली- 4 हजार 99, सातारा 3 हजार 839 व सोलापूर- 4 हजार 998 असे एकूण 23 हजार 117 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
राज्य शासनाने २ जून च्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ही योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत 1 एप्रिल 2019 ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या व ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकित असलेल्या व ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित फेरपुनर्गठित कर्जास रुपये दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असुन यासाठी शासनाने महाआयटी यांची नियुक्ती केली आहे. या योजनेसाठी महाआयटी यांनी तयार केलेल्या योजना पोर्टलवर बँकांनी एकुण ३१.१७ लाख थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटी यांनी संगणकीय संस्करण केलेल्या माहितीनुसार एकुण १६.९६ लाख इतक्या पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी २४ जुलै रोजी प्रसिध्द केली होती. या यादी मधील आधार प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांपैकी १२.५८ लाख पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीची रक्कम १० हजार ११५ कोटी पुढीलप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आले आहे.

7 ऑगस्ट 2026 रोजी 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 5028.60 कोटी रक्कम तर 24 ऑगस्ट 2026 रोजी 6.36 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 5086.30 कोटी रुपये असे एकूण 12.58 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 हजार 114.90 कोटी रक्कम रुपये जमा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी 11 सप्टेंबर रोजी ३.५५ लाख शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची यादी बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या यादीतील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे. या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम 31 मार्च 2026 रोजीची आहे. 1 एप्रिल 2026 रोजी नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करुन नजिकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. यादीतील राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकेसंदर्भात काही शेतकऱ्यांच्या ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम २ लाख रु. पेक्षा जास्त असली तरी शासनाच्या हेअर कट धोरणानुसार ही सर्व कर्ज निरंक करण्यात येणार आहेत.

योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतक-यांमध्ये मयत झालेल्या तसेच वयस्कर व बोटांच्या ठशाची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याच्या अनुषंगाने 19 ऑगस्ट 2026 रोजी मानक कार्यप्रणाली (SOP) निर्गमीत करण्यात आलेली आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular