कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचे चित्र दिवसेंदिवस रंगतदार होत असून ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट मत राज्याचे मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी व्यक्त केले. गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढविली जाईल आणि महायुतीच जिंकेल, असा दावा त्यांनी केला. गुरुवारी (दि. १७) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
गोकुळ निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले असून विविध दावे-प्रतिदावे सुरू आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणे अशक्य असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांशी अद्याप चर्चा नाही
गोकुळच्या पॅनेलच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे का, या प्रश्नावर मुश्रीफ यांनी अद्याप मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीची प्रक्रिया पुढे जाण्यास अजून वेळ असून मुदतीपूर्वी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले.
भाजपला गृहीत धरू नका, या खासदार धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, “कोण काय बोलतंय यापेक्षा महायुती होणार आहे आणि महायुतीच टिकणार आहे,” असे मुश्रीफ म्हणाले.
महायुतीतील वक्तव्यांमुळे मिठाचा खडा पडेल का, असा प्रश्न विचारला असता, “मिठाचा खडा-बिडा काहीही पडणार नाही. सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या संस्था कमी कशा होणार नाहीत, बार्गेनिंग पॉवर कशी वाढेल आणि सदस्यसंख्या कशी वाढेल, यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायालयीन लढाईबाबत ‘हे कोडं आम्हालाही उलगडलेले नाही’
गोकुळमधील न्यायालयीन लढाईबाबत आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या “सत्तेत असूनही तुम्हाला न्यायालयात का जावे लागले?” या वक्तव्याबाबत विचारले असता मुश्रीफ यांनी, “हा त्यांचा सवाल बरोबर आहे. हे कोडं अजून आम्हालाही उलगडलेलं नाही. यापूर्वीही मी अनेकवेळा सांगितलेलं आहे की हे सगळं अनाकलनीयच आहे,” असे उत्तर दिले.
अपात्र दूध संस्थांच्या पात्रतेवरून सुरू असलेल्या श्रेयवादाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, अपात्र संस्थांपैकी साधारण ७५ ते ८० टक्के संस्था राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) आणि जनसुराज्य पक्षाशी संबंधित आहेत. काँग्रेसशी संबंधित संस्था तुलनेने १५ ते २० टक्के असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे या संस्थांना पात्र करण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागल्याचे ते म्हणाले.
न्यायालयीन प्रक्रियेमुळे संस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे का, या प्रश्नावर, “थोडीशी नाराजी असणार आहे, ती दूर करू,” असे मुश्रीफ यांनी सांगितले.
जरांगे यांच्या उपोषणाबाबत शासनाचा प्रयत्न
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना मुश्रीफ यांनी जरांगे यांनी उपोषण सोडल्याबद्दल त्यांचे स्वागत केले. शासनाने १३ मागण्यांपैकी १२ मागण्या मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा संदर्भ देत, उर्वरित मागणी पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे त्यांनी नमूद केले. त्यामध्ये कायदेशीर अडचणी असल्यास त्या समजावून सांगण्याचा प्रयत्न शासन करेल, असेही ते म्हणाले.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाबाबत विचारले असता, “आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आहे. सीबीआय निष्पक्षपातीपणे तपास करेल,” असे मुश्रीफ यांनी सांगितले.
‘वहिनी आहेत ना…’ टॅगलाईनची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या टॅगलाईनबाबत मुश्रीफ यांनी पक्षाच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचे सांगितले. पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक येत्या २७ सप्टेंबरला नाशिक येथे घेण्याबाबतही चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले.
पुणे पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा
पुणे पदवीधर मतदारसंघातून प्रताप उर्फ भैया माने यांची उमेदवारी आधीच जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शरद लाड इच्छुक असल्याबाबत विचारले असता मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा या मतदारसंघातील पूर्वीच्या निवडणुकांमधील सहभाग आणि कामगिरीचा संदर्भ दिला.
गेल्या काही निवडणुकांमध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा राहिल्याचे सांगत त्यांनी भैया माने यांचे सिनेटमधील काम चांगले असल्याचे नमूद केले. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाचा खंड; दूधगंगेतून कालव्यांना पाणी
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने शेती आणि पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त होत आहे. याबाबत मुश्रीफ म्हणाले की, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील अनेक भागांत खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाअभावी माळरानावरील पिके धोक्यात आली आहेत.
दूधगंगा धरणातून दोन्ही कालव्यांमधून तातडीने पाणी सोडण्याची मागणी आपण जलसंपदामंत्री विखे-पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार आदेश देण्यात आले असून पाणी सोडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
कालव्याचे पाणी असो अथवा अन्य कोणतेही उपलब्ध पाणी, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाचवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑगस्ट २०२७ पर्यंतचे पिण्याचे पाणी राखून ठेवूनच पाण्याचे नियोजन केले जाईल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
गोकुळच्या निवडणुकीसंदर्भात महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप, उमेदवारी आणि संस्थांच्या संख्येवरून सुरू असलेली हालचाल पुढील काही दिवसांत अधिक वेग घेण्याची शक्यता असल्याचे राजकीय चित्र आहे.