पन्हाळा प्रतिनिधी (शहानवाज मुजावर):
सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पन्हाळा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला वेग दिला असून, पन्हाळा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील २४ आरोपींना पन्हाळा तालुक्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश पन्हाळा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी पारित केला आहे.
पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील संबंधित आरोपींना गणेशोत्सवाच्या कालावधीत पन्हाळा तालुक्यात प्रवेश करण्यास मनाई करण्याबाबतचा अहवाल पन्हाळा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यानुसार २४ आरोपींवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार संबंधित आरोपींना १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत, तर काही आरोपींना १७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पन्हाळा तालुक्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
यामध्ये नितीन भिमराव धनगर, महेश धोंडीराम म्हामणे, संदीप बाबुराव लाड, पांडुरंग बाबुराव लाड, उमेद श्रीपती सावंत, अनिकेत बळवंत कदम, पोपट श्रीपती गायकवाड, लक्ष्मण दिनकर गायकवाड, अक्षय आनंदा माने, संदीप नामदेव जाधव, विकास विलास वांद्रे, विक्रम पोपट गायकवाड, विलास मारुती चौगुले, सुरेश ज्ञानदेव जाधव, नंदकुमार ज्ञानदेव जाधव, प्रल्हाद शामराव पाटील, विलास लक्ष्मण पाटील, दिलीप दिनकर लोखंडे, अभिजीत प्रकाश कांबळे, आकाश प्रकाश कांबळे, सुरेश रंगराव लोखंडे, भाऊसो वैष्णु पलंगे आणि सुमित शंकर सातपुते यांचा समावेश आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मनाई आदेश असतानाही संबंधित आरोपी पन्हाळा तालुका क्षेत्रात आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी केले आहे.