कळे : रांजणगाव (पुणे) येथून कंपनीच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन गोव्याच्या दिशेने निघालेल्या कंटेनर (एम . एच.१२झेड यू ३४२४) चा मरळी (ता. पन्हाळा) येथील पुलाजवळ अपघात झाला. सोमवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास हा अपघात घडला. बाजूपट्टीवरून घसरलेला कंटेनर रस्त्यापासून सुमारे १५ फूट खाली जाऊन ऊसाच्या शेतात पलटी झाला. या अपघातात शेतकऱ्याच्या ऊसाचे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव येथील कंपनीतून पाण्याच्या बाटल्या भरून काही कंटेनर कोल्हापूर – गगनबावडामार्गे गोव्याच्या दिशेने निघाले होते. त्यापैकी एका कंटेनरचा मरळी पुलाजवळ अपघात झाला. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून उसाच्या शेतातून पळ काढल्याची माहिती आहे. या मार्गावरील नव्याने झालेल्या निकृष्ठ व कमी रुंदीच्या बाजूपट्टीमुळे अपघातांची अशी मालिका सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.