Thursday, October 29, 2026
HomePoliticalकोरम अभावी गोकुळची सभा तहकूब !

कोरम अभावी गोकुळची सभा तहकूब !

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाणारी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) होऊ शकली नाही. अध्यक्ष निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेला महायुतीचे १२ संचालक गैरहजर राहिल्याने आवश्यक कोरम पूर्ण झाला नाही. परिणामी, सकाळी सुरू झालेली निवड प्रक्रिया अवघ्या काही वेळात तहकूब करावी लागली. या राजकीय खेळीमुळे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला धक्का बसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गोकुळ दूध संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकून बहुमत मिळवले होते. तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक समविचारी आघाडीसाठी महत्त्वाची मानली जात होती. मात्र, अध्यक्ष निवडीच्या सभेलाच महायुतीचे संचालक अनुपस्थित राहिल्याने निवड प्रक्रिया रखडली.

कोरमअभावी सभा तहकूब

अध्यक्ष निवडीची सभा पार पाडण्यासाठी नियमानुसार किमान १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक होती. समविचारी आघाडीचे सर्व १३ संचालक सकाळी अकरा वाजण्यापूर्वीच गोकुळ दूध प्रकल्पाच्या कार्यालयात दाखल झाले होते. मात्र, महायुतीचे १२ संचालक सभेला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे आवश्यक कोरम पूर्ण होऊ शकला नाही.

दुपारी बारापर्यंत आवश्यक उपस्थिती पूर्ण होते का, याची प्रतीक्षा करण्यात आली. मात्र, महायुतीचा एकही संचालक सभास्थळी न आल्याने अखेर दुपारी सुमारे १२ वाजून १० मिनिटांनी सभा तहकूब करण्यात आली. सहकार नियमांतील कोरमसंबंधी तरतुदींचा आधार घेत ही सभा तहकूब करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

समविचारी आघाडीचे सर्व १३ संचालक उपस्थित

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी समविचारी आघाडीचे संचालक वेळेत सभास्थळी दाखल झाले होते. यामध्ये शशिकांत पाटील चुयेकर, बाबासो चौगुले, अभिजीत तायशेटे, प्रा. किसन चौगले, राहुल देसाई, शशिकांत खोत, विश्वजीत जाधव, अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे, बाबासाहेब देवकर, विद्याधर गुरंबे, बयाजी शेळके आणि राजूबाबा आवळे यांचा समावेश होता.

निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रेमदास राठोड आणि युसुफ शेख यांच्या उपस्थितीत सभेची कार्यवाही सुरू झाली. मात्र, आवश्यक कोरमअभावी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुढे नेता आली नाही.

गोकुळ प्रकल्प परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्प परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. तसेच गोकुळ दूध संघाच्या आवारात ओळखपत्रांची तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जात होता.

दरम्यान, समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रकल्पाबाहेर मोठी गर्दी केली होती. काँग्रेसचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अध्यक्षपदाची निवड होणार की सभा तहकूब होणार, याबाबत परिसरात उत्सुकता निर्माण झाली होती.

गोकुळमधील राजकीय संघर्ष पुन्हा ऐरणीवर

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर अध्यक्षपदाची निवड निर्विघ्नपणे होईल, अशी अपेक्षा समविचारी आघाडीला होती. मात्र, महायुतीच्या १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवड प्रक्रिया रखडली. या घडामोडीमुळे गोकुळमधील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला आहे.

महायुतीच्या नेत्यांनी संचालकांना सभेपासून दूर ठेवून राजकीय डावपेच खेळल्याची चर्चा सुरू असली, तरी यासंदर्भात संबंधित नेत्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही. आता अध्यक्ष निवडीची पुढील सभा कधी होणार आणि शशिकांत पाटील चुयेकर यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग कसा मोकळा होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular